कसबा पेठ : पणत्यांनी सजला कुंभारवाडा! गुजरात, प. बंगाल, राजस्थानमधील विविध वस्तू दाखल | पुढारी

कसबा पेठ : पणत्यांनी सजला कुंभारवाडा! गुजरात, प. बंगाल, राजस्थानमधील विविध वस्तू दाखल

कसबा पेठ : दिवाळीचे अतूट नाते असणार्‍या वेगवेगळ्या प्रकारच्या विविध आकारातील पणत्यांची कसबा पेठेतील कुंभारवाड्यात बुधवारी (दि.12) विक्री करण्यात येत आहे. कुंभारवाड्यातील पणत्यांना मोठी मागणी आहे. गुजरात (खानवड), प. बंगाल, राजस्थान, कोलकता येथून विक्रीसाठी या पणत्या कुंभारवाड्यात दाखल झाल्या असून, पणत्यांना रंग देण्यासाठी लागणारे मेटेलिंग कलर 10 ते 15 शेडमध्ये कुंभारवाड्यात विक्रीसाठी उपलब्ध असल्याची माहिती कुंभारवाड्यातील पणत्या विकेत्यांनी दिली.

कुंभारवाड्यातील लाल मातीपासून बनविण्यात आलेल्या पणत्यांना विशेष मागणी आहे. त्याचबरोबर येथील पीओपी व चिनी मातीपासून बनविलेले मंदिर, नारळ, झोपडी आकाराची पणती, मोर, दीपमाळ, मेण घालून पणती, कटिंग पणती, मडकी पणती, काचेची असलेली पणती, 21 दिवा थाळी, मेण घालून दिवा, मातीचे कंदील, अखंड दिवे, कासव दिवा, हत्तीवाली पणती, आकाशकंदील दिवे, कासव पणती अशा विविध आकारातील पणत्या कुंभारवाड्यात विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी भाव 25 ते 30 टक्के वाढले आहेत. रंग महाग झाल्याने तसेच पेट्रोल, डिझेलचे भाव वाढल्याने यंदा किल्ले, चित्रे, महाराज मूर्ती, लक्ष्मी मूर्ती यांच्या किमती वाढल्या असल्याचे कुंभारवाड्यातील विक्रेत्यांनी सांगितले.कसबा पेठेतील कुंभारवाडा व केशवनगर मुंढवा येथे होलसेलमध्ये मूर्ती विकत मिळत असल्याने या ठिकाणी कोकण, मुंबई, नागपूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील ग्रामीण भागातील पणत्यांचे किरकोळ विक्रेते तसेच शहर व उपनगरांतील घरगुती ग्राहकांची येथील मालाला मोठी मागणी आहे.

कलरचे रेट वाढले की बजेट वाढते. 25 ते 30 टक्के पेंट महागल्याने पणत्या, किल्ले, चित्रे, महाराज मूर्ती, लक्ष्मी मूर्तीचे दर वाढले आहेत. मागील वर्षी टनामागे 2500 रुपये वाहतूक खर्च येत होता. यंदा हाच खर्च 3700 रुपये लागला. आमचा माल कोलकता, गुजरातवरून येतो.
                                                        नवनाथ शिर्के, विक्रेते, कुंभारवाडा

साध्या पणत्या – 20 रुपये डझन
डिझाईन पणत्या – 40 ते 50 डझन
मोर पणती – 60 रु. नग
दीपमाळ – 150 ते 200 रु. नग
कंदील पणती – 120 रु. नग
हत्ती पणती – 70 रु. नग (लहान)
हत्ती पणती – 120 रु. नग (मोठी)
नारळ पणती – 40 रु नग
मंदिर पणती – 60 रु. नग
मेणाचे मडके – 72 रु. डझन (लहान)
मेणाचे मडके – 120 रु. डझन (मोठे)
कासव दिवा – 40 पासून

Back to top button