नगर: देवराई-घाटशिरस रस्ता काम निकृष्ट, सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी निवेदन देऊन ग्रामस्थांच्या तक्रारी | पुढारी

नगर: देवराई-घाटशिरस रस्ता काम निकृष्ट, सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी निवेदन देऊन ग्रामस्थांच्या तक्रारी

करंजी, पुढारी वृत्तसेवा: पाथर्डी तालुक्यातील मिरी त्रिभुवनवाडी देवराईमार्गे घाटशिरसपर्यंत रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी सुमारे दोन कोटीहून अधिक रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र, या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत.

या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी खोदण्यात आलेल्या साईड पट्ट्यातील काळ्या मातीतच मुरूम टाकला जात आहे. त्यामुळे भविष्यकाळात हा रस्ता खचण्याची शक्यता आहे. तसेच, रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असताना कुठेही सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत. घाईगडबडीत या रस्त्याचे काम उरकून घेण्याचा ठेकेदाराचा प्रयत्न आहे. कामासाठी निकृष्ट दर्जाचे मटेरियल या कामासाठी वापरले जात आहे. संबंधित अधिकार्‍यांचे देखील या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे.

एकदा रस्ता झाल्यानंतर त्याला पुढील अनेक वर्षे निधी मिळत नाही. त्यामुळे अधिकार्‍यांनी डोळ्यात तेल घालून या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करून घेण्याची गरज आहे. या रस्त्याने वृद्धेश्वरला जाणार्‍या भाविकांची संख्या मोठी आहे. या रस्त्याच्या कामासंदर्भात घाटशिरसचे माजी सरपंच नवनाथ पाठक, देवराईचे ग्रामपंचायत सदस्य विष्णू पालवे, सामाजिक कार्यकर्ते गणेश कर्डिले यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी निवेदन देऊन या रस्त्याच्या कामासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अधिकार्‍यांनी कामाच्या संदर्भात हलगर्जीपणा करू नये. निकृष्ट काम झाल्यास संबंधित अधिकार्‍यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Back to top button