कुरकुंभ: ग्रामीण तरुणाई गांजाच्या विळख्यात | पुढारी

कुरकुंभ: ग्रामीण तरुणाई गांजाच्या विळख्यात

कुरकुंभ, पुढारी वृत्तसेवा: ग्रामीण भागात गांजाची खुलेआम विक्री होत असल्याने व्यसन करणार्‍या युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ग्रामीण तरुणाईला गांजाचा विळखा बसला आहे, याकडे पोलिसांचे अजिबात लक्ष नाही. गांजा सर्वत्र सहज मिळत आहे. अनेक जण गांजाच्या विळख्यात अडकलेले आहेत. रेल्वेत झाडू मारणारे, चहा-भेळ विकणारे, मोलमजुरी करणारे, भिक्षेकरी, वाहनचालक, एमआयडीसीतील कामगार, परप्रांतीय मजुरांसह काही सुशिक्षित तरुणांचा यामध्ये समावेश आहे. सकाळी उठल्यापासून दिवसभर हे तरुण नशेत वावरत असल्याचे दिसून येते. गांजा खरेदीसाठी लागणार्‍या पैशासाठी अनेकदा नशेत प्रवाशांना दमदाटी करून लुटण्याचे प्रकार घडले आहेत.

पूर्वी गांजा विक्रीची माहिती मिळताच पोलिसांकडून त्वरित कारवाई केली जात होती. आता ऊठसूट कोणीही खुलेआम हा व्यवसाय करीत आहे. साधारण शंभर रुपयांना गांजाची पुडी विकली जाते. विशिष्ट वेळेतच पहाटे, रात्री ही विक्री होते. सकाळी किंवा दुपारी ओळखीचे ग्राहक असेल, तरच विक्री होते. काही ठरावीक ग्राहक तर चारचाकीतून गांजा खरेदीसाठी येतात. गांजा कुठे मिळतो? विक्री कोण करतात? याचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर आव्हान आहे. या व्यवसायातून मोठी उलाढाल होते. याचा योग्यरीतीने शोध घेतल्यास मोठी टोळी हाती लागण्याची शक्यता आहे. पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून गांजाची वाहतूक होते, असे अनेकदा समोर आले आहे. गांजाची वाहतूक करणार्‍या वाहनांसह गांजाचे पोते पोलिसांनी ताब्यात घेत संबंधितांवर कारवाई केल्या आहेत.

Back to top button