शिरूर: राजकीय हेतूने राज्य सहकारी बँकेची बदनामी, सुधीर फराटे यांची आ. अशोक पवार यांच्यावर टीका | पुढारी

शिरूर: राजकीय हेतूने राज्य सहकारी बँकेची बदनामी, सुधीर फराटे यांची आ. अशोक पवार यांच्यावर टीका

मांडवगण फराटा, पुढारी वृत्तसेवा: रावसाहेबदादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याला या 15 दिवसांत 35 व 20 कोटी, असे 55 कोटी तारण कर्ज आगामी ऊस गळीत हंगाम चालू करण्यासाठी राज्य सहकारी बँकेने दिले आहे. नागरगाव येथे नुकत्याच झालेल्या सभेत कारखान्याचे अध्यक्ष अशोक पवार म्हणाले होते की, नागवडे कारखान्याला 80 कोटी मिळाले; मग आपल्याला कर्ज देताना सरकार दुटप्पी भूमिका घेत आहे, असा आरोप त्यांनी केला होता. राजकीय हेतूने ते राज्य सहकारी बँकेची बदनामी करीत असल्याचा आरोप शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुधीर फराटे इनामदार यांनी केला आहे. घोडगंगा किसान क्रांतीच्या वतीने मांडवगण फराटा येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी फराटे बोलत होते.

या वेळी ते म्हणाले की, मागील गळीत हंगामात किती गाळप केले, यावर ही रक्कम ठरत असते. 14 दिवसांत एफआरपी देणे बंधनकारक असताना घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष एफआरपी उशिरा देऊन प्रसिद्धीच्या माध्यमातून स्वतःचे कौतुक करून घेत आहेत. को-जन प्रकल्पाला उशीर का झाला, याचे पुरावे सादर करावेत; अन्यथा आम्ही सभासद त्यांच्यावर चुकीचे आरोप करून सभासदांची दिशाभूल करतात म्हणून येत्या 10 दिवसांत आम्हाला अशोक पवार यांच्यावर गुन्हा दाखला करावा लागेल, असा इशारा या वेळी फराटे यांनी दिला. दोन दिवसांपूर्वी जमा झालेली एफआरपी ही गेल्या हंगामातील आहे. एफआरपी देणे हा कायदेशीर हक्क आहे. एफआरपी मिळाली नाही म्हणून साखर आयुक्त यांनी कारखान्याला जप्तीची नोटीस बजावली होती.

तसेच मागील हंगामात कारखान्याला 2 कोटी 60 लाख रुपये दंड झाला आहे, अशी माहिती फराटे यांनी दिली. या वेळी सोसायटीचे अध्यक्ष गोविंद फराटे म्हणाले की, राष्ट्रवादीचे विद्यमान अध्यक्ष खासगीत भेटले की नातेवाईक सांगतात अन् सभेत आमच्यावर वैयक्तिक टीका करतात. आम्ही संयम राखतो, याचा त्यांनी वेगळा अर्थ काढू नये. आमच्या नादी लागाल तर आम्हीपण तुमचा योग्य तो समाचार घेऊ शकतो. काकासाहेब खळदकर म्हणाले की, घोडगंगा साखर कारखान्याने ज्याप्रमाणे एफआरपी पूर्ण केली, त्याप्रमाणे कामगारांचे पगार देऊन टाकावेत. या वेळी घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक आत्माराम फराटे, सोसायटीचे अध्यक्ष गोविंद फराटे, प्रभाकर घाडगे, बिभीषण फराटे, वीरेंद्र शेलार, शरद गायकवाड आदी उपस्थित होते.

Back to top button