मेघालयातील गुहेत दडलाय हवामानाचा इतिहास | पुढारी

मेघालयातील गुहेत दडलाय हवामानाचा इतिहास

शिलाँग : ईशान्य भारतातील मेघालयाची ओळख सर्वाधिक पर्जन्यमान असलेले राज्य अशीही आहे. नावाप्रमाणेच इथे आकाश मेघाच्छादीतच असते. तेथील एका गुहेत देशातील गेल्या एक हजार वर्षांच्या काळातील पाऊस व कोरडे हवामान यांची माहिती दडलेली आहे. या गुहेतील खनिज स्तंभांच्या अध्ययनावरून ही माहिती समोर येते. भूतकाळातील हवामानाच्या अनेक रहस्यांवरील पडदा या गुहेच्या अभ्यासातून बाजूला होऊ शकतो असे संशोधकांना वाटते.

याबाबतच्या संशोधनाची माहिती ‘प्रोसिडिंग्ज ऑफ द नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेज’च्या ताज्या अंकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या रिपोर्टमुळे प्राचीन काळातील हवामानाबाबतच्या जुन्या धारणांना छेद गेला आहे. या गुहेत शेकडो वर्षांपासून ठिबकत असलेल्या पाण्यामुळे जमा झालेले खनिज व चुनखडीच्या साठ्याने देशातील बदलते हवामान, दुष्काळ आणि पुराबाबतची भविष्यवाणीही करता येऊ शकेल असे संशोधकांना वाटते. सुमारे तीन वर्षांपूर्वी अमेरिकेच्या वंडरबिल्ट युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या एका टीमने दावा केला होता की ही गुहा हवामान बदलाच्या न उलगडलेल्या रहस्यांवरीलही पडदा हटवू शकते.

मेघालयाची राजधानी शिलाँगपासून सुमारे 57 किलोमीटरवर ही चेरापुंजीतील मावम्लूह गुहा आहे. ही गुहा एखाद्या भूगर्भीय खजिन्यापेक्षा कमी नाही. या गुहेत एक हजारपेक्षाही अधिक वर्षांपासून एकाच जागेवर छतातून पावसाचे पाणी हळूहळू ठिबकत आहे. प्रत्येक थेंबाबरोबर पाण्यात मिसळलेली खनिजे तळात जमा होऊन कॅल्शियम कार्बोनेटच्या मनोर्‍यांचे रूप घेऊन वाढत आहेत. त्यांना स्टॅलेग्माइटस् असे म्हटले जाते. हे स्टॅलेग्माइटस् भूगर्भीय चमत्कारांपेक्षाही अधिक चमत्कारी आहेत. त्यांच्या स्तरांमध्ये जणू काही पावसाचा इतिहास कोरलेला आहे!

Back to top button