ठाणे : अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या गाडीचा अपघात | पुढारी

ठाणे : अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या गाडीचा अपघात

ठाणे; पुढारी वृत्तसेवा ; कल्याणचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांच्या गाडीचा अपघात झाल्याची घटना घडली. स्पीड ब्रेकरवर गाडीचा वेग करत असताना मागून येणाऱ्या कंटेनरने ही धडक दिली. सुदैवानं यामध्ये कुणालाही इजा झालेली नाही.

कल्याणचे अतिरिक्त पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे हे सोमवारी मलंगगड परिसरात आले होते. ललिता पंचमीला मलंगगडावर होणाऱ्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पाहणी करण्यासाठी शिंदे हे पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त आणि परिमंडळ ४ मधील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्यासह आले होते. तिथून परतत असताना नेवाळी पोलीस चौकीजवळ त्यांची गाडी येताच समोर स्पीड ब्रेकर आल्यानं चालकाने ब्रेक मारला. यावेळी मागून आलेल्या भरधाव कंटेनरने अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या गाडीला धडक दिली. यामध्ये गाडीचे नुकसान झाले असले, तरी सुदैवानं अतिरिक्त आयुक्त शिंदे आणि त्यांच्या ताफ्यातील कर्मचाऱ्यांना काहीही इजा झाली नाही. याप्रकरणी कंटेनर चालक मोहम्मद परवेझ खान याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांनी दिली.

हेही वाचा

Back to top button