Emraan Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीवर हल्ला! काश्मिरच्या भर बाजातपेठेत झाली दगडफेक | पुढारी

Emraan Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीवर हल्ला! काश्मिरच्या भर बाजातपेठेत झाली दगडफेक

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मीवर (Emraan Hashmi) काश्मीरमध्ये हल्ला झाला आहे. स्थानिक बाजारपेठेत अज्ञातांनी इम्रानवर दगडफेक केली. मात्र, यात त्याला कोणतीही दुखापत झालेली नाही. अनेकवेळा बॉलिवूड कलाकारांना शूटिंगदरम्यान त्रासाचा सामना करावा लागतो. असाच काहीसा प्रकार सोमवारी काश्मीरमध्ये अभिनेता इम्रान हाश्मीसोबत घडला. तो सध्या त्याच्या ‘ग्राउंड झिरो’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी काश्मीरच्या पहलगाममध्ये आहे. शूट संपल्यानंतर तो बाजारात फिरायला गेला होता, तिथे काही उपद्रवी स्थानिकांनी त्याच्यावर दगडफेक सुरू केली. मात्र, या दगडफेकीत इम्रानला दुखापत झाली नाही. तो पूर्णपणे ठीक आहे. मात्र या घटनेनंतर अभिनेत्याची सुरक्षा नक्कीच वाढवण्यात आली आहे.

वृत्तानुसार, इम्रान हाश्मी (Emraan Hashmi) सध्या काश्मीरमध्ये त्याचा आगामी चित्रपट ग्राउंड झिरोचे शूटिंग करत आहे. शूटिंग संपल्यानंतर तो त्याच्या चित्रपटाच्या युनिटमधील काही लोकांसह बाजारात फिरायला गेला होता. त्यानंतर काही लोकांनी त्याच्यावर दगडफेक सुरू केली. या प्रकरणी पहलगाम पोलिस ठाण्यात आयपीसीच्या वेगवेगळ्या कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 24 ऑगस्ट रोजी इम्रान मुंबईहून श्रीनगरला रवाना झाला होता. त्यानंतर त्याने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून माहिती दिली होती.

बीएसएफ जवानावर आधारीत चित्रपट

इम्रान हाश्मीने (Emraan Hashmi) पहलगामला पोहचण्यापूर्वी 14 दिवस श्रीनगरमध्ये या चित्रपटाचे शूटिंगही केले. ‘ग्राउंड झिरो’ हा चित्रपट पाकिस्तानच्या सीमेवर कर्तव्य बजावत असलेल्या बीएसएफ जवानाची कथा आहे. ‘ग्राउंड झिरो’ या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर, तेजस देउस्कर याचे दिग्दर्शन करत आहे. यात इम्रानसोबत झोया हुसैन आणि सई ताम्हणकर देखील दिसणार आहेत. याशिवाय इम्रान हाश्मी लवकरच सलमान खान आणि कॅटरीना कैफसोबत ‘टायगर 3’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तो खलनायकाची भूमिका सकारून सलमान खान समोर तगडे आव्हान उभे करणार आहे.

मल्याळम चित्रपट ‘ड्रायव्हिंग लायसन्स’चा हिंदी रिमेक ‘सेल्फी’मध्ये इम्रान अक्षय कुमारसोबत काम करत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ‘सेल्फी’ ही अशाच एका फिल्मस्टारची कथा आहे, ज्याने चाहत्यासोबत सेल्फी घेण्यास नकार दिला. तो चाहता पोलिस आहे. या चित्रपटात इम्रान हाश्मी त्याच पोलिसाची भूमिका साकारत आहे. ‘गुड न्यूज’ आणि ‘जुग जुग जिओ’ सारखे चित्रपट बनवणारे राज मेहता या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.

Back to top button