संगमनेर : ‘खोके’ पोस्टप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल | पुढारी

संगमनेर : ‘खोके’ पोस्टप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील स्टोन क्रशर बंद केले आहेत. स्टोन क्रशर चालकांना कायदे व नियम दाखवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी कार्यकर्त्यांच्या मध्यस्थीने ‘तुम्ही दिले खोके तर चालतील क्रशर एकदम ओके’ अशा आशयाच्या सोशल माध्यमातून पोस्ट शेअर केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी शहर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून बदनामीचा गुन्हा दाखल झाला आहे.  याबाबत संगमनेर शहर पोलिसांनी सांगितले की, अमोल खताळ यांच्या एका मित्राने सोशल पोस्टद्वारे बदनामी केली जात असल्याची माहिती खताळ यांना दिली.

या माहितीच्या आधारावर त्यांनी सखोल चौकशी केली असता, अशा मजकुरात पोस्ट त्या व्यक्तीशिवाय अन्य दोघांनी अन्य दोन समूहांमध्ये पोस्ट शेअर करुन, त्यात थेट आपल्या नावाचा उल्लेख करुन, जाहीर बदनामी केल्याचे आढळले. खताळ यांना पोस्ट सोशल माध्यमात तीन समूहात असल्याचे आढळले. ती शेअर करणार्‍या व्यक्तींचे मोबाईल क्रमांक व नावांसह खताळ यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी पराग थोरात, बाबासाहेब खेमनर व प्रतीक थोरात या तिघांविरोधात समाज माध्यमात बदनामीकारक मजकूर शेअर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Back to top button