राजगुरुनगर : पितृपक्षात दस्तनोंदणी ठप्प; हक्कसोडपत्रासाठी गर्दी | पुढारी

राजगुरुनगर : पितृपक्षात दस्तनोंदणी ठप्प; हक्कसोडपत्रासाठी गर्दी

राजगुरुनगर; पुढारी वृत्तसेवा: पितृपक्षात कोणतेही शुभकार्य, खरेदी-विक्रीचे व्यवहार करणे टाळले जातात. यामुळेच सध्या दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणी ठप्प आहे, परंतु पितृपक्षात आपल्या आई-वडिलांच्या पितरांसाठी आयत्या घरी आलेल्या माहेरवाशिणींचा असा फायदा घेत मोठ्या प्रमाणात हक्कसोडपत्र करून घेतले जात आहे. यामुळे सध्या खेड तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात हक्कसोडपत्र करण्यासाठी मोठी गर्दी दिसत आहे.

पितृपक्षात पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात, अशी श्रद्धा आहे. पितृपक्षाचे 15 दिवस वाईट मानून या काळात सोने, घर तसेच मौल्यवान वस्तूंची खरेदी-विक्री होत नाही. विवाहमुहूर्तही टाळले जातात, यामुळेच या पंधरा दिवसांत दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीचे कामही ठप्प असते. खेड तालुक्यात तीन दुय्यम निबंधक कार्यालये असून, प्रत्येक कार्यालयात दररोज सरासरी 15 ते 20 दस्तांची नोंदणी होते. परंतु पितृपक्ष सुरू झाल्यापासून ही संख्या शून्यावर आली आहे.

परंतु महामार्ग, पुणे- नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेमार्ग, रिंगरोड, एमआयडीसीतील विविध प्रकल्पांमुळे जमिनीला प्रचंड भाव आले आहेत. त्यात कधी नव्हे त्या बहिणी, आत्या, त्यांचे वारसदार भावाच्या मालमत्तेवर हक्क सांगू लागल्या आहेत. यामुळे कुटुंबा-कुटुंबात प्रचंड वादही निर्माण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर बहिणी, आत्याचे हक्कसोड करून घेण्याचे प्रमाणही वाढले आहे किंवा जमिनीचा मोबदला एकाच व्यक्तीच्या नावावर जमा होण्यासाठी सोयीचे जावे म्हणूनही हक्कसोडपत्र केले जात आहेत.

दर वर्षी पितृपक्षात शक्यतो दस्त नोंदणीसाठी लोक येत नाहीत. इतर वेळेस मात्र कार्यालयात खूप गर्दी असते. सध्या दस्त नोंदणी ठप्प आहे, पण गेल्या काही दिवसांपासून हक्कसोडपत्र करण्यासाठी महिलांची कार्यालयात गर्दी होत आहे.

                                                        – सीमा राजापुरे, प्रभारी दुय्यम निबंधक, खेड.

हक्कसोडपत्र हे लेखी आणि नोंदणीकृत असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा त्याची नोंद सरकारी दप्तरात होणार नाही. हक्कसोडपत्र म्हणजे दान/ बक्षीस पत्र. हक्कसोडपत्रामुळे हक्काचे हस्तांतरण होते. मालमत्ता हस्तांतरण अधिनियम, 1882 कलम 123 अन्वये असे दान/ बक्षीसद्वारे झालेले हस्तांतरण नोंदणी झालेल्या लेखाने करणे आवश्यक असते. नोंदणी अधिनियम 1908, कलम 17 अन्वये स्थावर मालमत्तेचे दान लेख यांची नोंदणी करणे आवश्यक आहे.
                                                                    – अ‍ॅड. युवराज घोलप, वकील.

Back to top button