आंबेगावच्या उत्तर भागात शेतीचे मोठे नुकसान; पंचनामे करण्याची शेतकर्‍यांची मागणी | पुढारी

आंबेगावच्या उत्तर भागात शेतीचे मोठे नुकसान; पंचनामे करण्याची शेतकर्‍यांची मागणी

महाळुंगे पडवळ; पुढारी वृत्तसेवा: आंबेगाव तालुक्यातील चास, महाळुंगे पडवळ, साकोरे, नांदूर, विठ्ठलवाडी, टाकेवाडी, गिरवली परिसरात आठ दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे घरे, शेती व स्मशानभूमीचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य सरकारने नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्या, असे सांगितले असले तरी नुकसानीचे पंचनामे अद्याप झालेले नाहीत.

पाहणीच नाही तर भरपाई कशी जमा होणार, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. चास-ठाकरवाडी येथील ठाकर समाजातील रहिवाशांचे पावसामुळे मोठे नुकसान झाले. साकोरे येथे दशरथ विठ्ठल मोढवे यांच्या शेतीचा बांध फुटला. तसेच उसासह मका, ज्वारी अन्य तरकारी पिकांचे नुकसान झाले. या भागातील ओढ्याला पूर आल्याने सैदवाडी येथील पादरमळा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा उखडला आहे. स्मशानभूमीत पाणी शिरल्याने फरशी वाहून गेली. तसेच स्मशानभूमीचे शेड खचले आहे.

अनेक शेतकर्‍यांच्या मोटारी पाण्यात गेल्या आहेत. साकोरे येथील शेतकरी बळीराम गाडे यांच्या शेतातील माती वाहून गेली आहे. आवटे मळा येथे डोंगराचा मुरूम रस्त्यावर आल्याने वाहतूक विस्कळित झाली होती. गाडेपट्टीतील अनेक शेतांचे बांध फुटले. नांदूर जाधव स्थळ येथे रस्ता पुरामुळे खचला. या रस्त्याची बांधकाम विभागाने अद्याप पाहणी केलेली नाही.

चास, ठाकरवाडी ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील पिराचीवाडी परिसरात जवळपास 40 हून अधिक घरांत पाणी घुसले होते. त्यामुळे संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. येथील रस्ते वाहून गेले आहेत. नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी प्रशासनाने पावले उचललेली नाहीत.  याबाबत महाळुंगे पडवळ येथील गावकामगार तलाठी अश्विनी गोरे म्हणाल्या, या भागात जोरदार पाऊस पडला आहे.

महसूल विभागाकडून अद्यापही पंचनामे करण्याचे आदेश नाहीत. कृषी सहायक अशोक बाळसराफ, पप्पू उगले यांनी अनेक शेताचे बांध फुटून ऊस भुईसपाट झाला आहे. कोबीच्या शेतात पाणी दिसत आहे, हे जरी खरे असले तरी शेतकर्‍यांना मदत करण्याचे आदेश अद्याप आलेले नाहीत, असे सांगितले.

 

Back to top button