पुणे : देखाव्यांची उंची नियमानुसार ठेवा; विसर्जन मिरवणुकीबाबत पोलिसांचे आवाहन | पुढारी

पुणे : देखाव्यांची उंची नियमानुसार ठेवा; विसर्जन मिरवणुकीबाबत पोलिसांचे आवाहन

पुणे; पुढारी वृत्तसेवा: गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी मेट्रो ओव्हर ब्रिजमुळे देखाव्यांना पुढे सरकण्यास अडचण होऊ नये यासाठी मिरवणुकीतील देखाव्यांची उंची दिलेल्या नियमानुसार निर्धारित ठेवण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे. याबाबतची माहिती डेक्कन पोलिसांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. खंडुजीबाबा चौक येथे लकडी पुलावर नव्याने निर्माण झालेल्या मेट्रो ओव्हर ब्रिजची उंची 21 फूट आहे. संभाजी पुलावरून (लकडी पूल) येणार्‍या सार्वजनिक गणेश मंडळांनी त्यांच्या विसर्जन रथाची देखाव्यासह कमाल उंची 18 फूट ठेवावी.

कर्वे रोडवरील गरवारे मेट्रो स्टेशन येथील कर्वेरोड रस्त्यापासून मेट्रो स्टेशनची उंची 18 फूट आहे. तसेच नळस्टॉप कर्वेरोड येथील मेट्रो ओव्हर ब्रिजची उंची 17 फूट असून, कर्वे रोडवरील ओव्हर ब्रिजलगतच्या दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडची कमीत कमी रुंदी ही 15 फूट आहे. त्यामुळे कर्वेरोड मार्गे मुख्य विसर्जन मिरवणुकीत समाविष्ट होणार्‍या सार्वजनिक गणेश मंडळांनी त्यांच्या विसर्जन रथाची देखाव्यासह कमाल उंची 16 फूट ठेवावी व लगतच्या सर्व्हिस रोडची कमीत कमी रुंद ही 15 फूट असल्याने देखाव्याच्या रथाची कमाल रुंदी 12 फूट ठेवावी, असे आवाहन डेक्कन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मुरलीधर करपे यांनी केले आहे..

Back to top button