शिवसेना कुणाची?; उद्धव-शिंदे गटाकडे निवडणूक आयोगाने मागितले ठोस पुरावे, ८ ऑगस्ट पर्यंत मुदत | पुढारी

शिवसेना कुणाची?; उद्धव-शिंदे गटाकडे निवडणूक आयोगाने मागितले ठोस पुरावे, ८ ऑगस्ट पर्यंत मुदत

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेत बहुमत कोणाचे, ते कागदोपत्री पुराव्यांसह सिद्ध करा, असे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आमचीच खरी शिवसेना, असा दावा करणारे बंडखोर नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुक्रवारी दिले.

येत्या 8 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत आपापले पुरावे सादर करा. त्यानंतर दोन्ही गटांच्या वादावर सुनावणी घेतली जाईल, असे आयोगाने म्हटले आहे. महाराष्ट्रात सरकार स्थापन केल्यानंतर लोकसभेतही 12 खासदारांनी शिंदे गट स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेत थेट शिवसेनेवरच हक्क सांगितला. निवडणूक चिन्ह नियम 1968 नुसार शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचे जाहीर करा आणि शिवसेनेचे ‘धनुष्य बाण’ हे चिन्ह शिंदे गटाला बहाल करा, अशी मागणी शिंदे गटाने आयोगाकडे केली आहे.

महाराष्ट्र विधानसभेत 55 पैकी 40 आमदार आणि 18 पैकी 12 खासदार आमच्यासोबत असल्याचेही शिंदे गटाने आयोगाला सांगितले. दुसरीकडे, शिवसेनेनेही अनिल देसाई यांच्यामार्फत आयोगासमोर शिंदे गटाविरुद्ध पक्षविरोधी कारवायांची तक्रार केली आहे. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना यांचा वापर कोणत्याही पक्षाला करू देण्यास शिवसेनेने आयोगाकडे आक्षेप नोंदविला आहे.

Back to top button