ग्राहकांना दिलासा! खाद्यतेल २० रुपयांनी स्वस्त | पुढारी

ग्राहकांना दिलासा! खाद्यतेल २० रुपयांनी स्वस्त

सांगली : पुढारी वृत्तसेवा; आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलांचे भाव कमी झाल्याने जिल्ह्यात तेलाच्या किमती सुमारे 20 ते 25 रुपयांनी कमी झाल्या आहेत. परिणामी ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्‍त होत आहे. गेल्या सहा महिन्यांत तेलाच्या दरात प्रचंड वाढ झाली होती. लिटरमागे सुमारे 60 ते 70 रुपयांनी दर भडकले होते. मे महिन्यात तर सर्व खाद्यतेलांच्या दराने उच्चांक गाठला होता. परिणामी गृहिणीचे महिन्यांचे बजेट कोलमडले होते. त्यामुळे सर्वच थरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. गेल्या काही दिवसांत विविध राजकीय पक्षांनी रस्त्यावर येऊन दरवाढीविरोधात आंदोलने केली.

भारतात सुमारे 75 टक्के खाद्यतेलांची आवक केली जाते. तर 30 ते 35 टक्के तेल देशात तयार होते. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीत तेलबिया पिकांचे मोठे नुकसान झाले होते. तसेच दोन वर्षांपासून सुरू असलेल्या कोरोना आणि लॉकडाऊनचाही तेलबियांच्या उत्पादनावर परिणाम झाला होता. परिणामी आयात कमी झाली होती. त्याचबरोबर केंद्र सरकारने तेलाचा आयात खर्च वाढविला होता. यामुळे देशांतर्गत खाद्यतेलांच्या किमतीत मोठी वाढ झाली होती. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्यतेलाचे भाव कमी झाले आहेत. त्यामुळे खाद्यतेलांच्या किमती 20 ते 25 रुपयांनी कमी झाल्या आहेत. पामतेलाचे दर 27 रुपयांनी कमी झाले आहे.

गेल्या महिन्यातील खाद्यतेलांचे प्रती लिटर आणि कंसात सध्याचे दर असे ः पामतेल – 145 (118), सोयाबीन – 155 (130), सूर्यफूल – 185 (165), शेंगदाणे – 175 (170). केंद्र सरकारने देशांतर्गत आयात खर्च कमी केल्यास दर आणखी कमी होतील, असे खाद्यतेल विके्रत्यांनी सांगितले.

Back to top button