डोंबिवली : दिवसाढवळ्या सोनेचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बेड्या | पुढारी

डोंबिवली : दिवसाढवळ्या सोनेचोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बेड्या

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : दिवसा ढवळ्या घरफोडी करून सोने चोरी करणाऱ्या आरोपीस मानपाडा पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून ३६ लाख रुपयाचे जवळपास ७१ तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. मुळचा पश्चिम बंगालचा असणारा आणि मुंबई येथे राहणारा अभिजित आलोक रॉय(३६) या आरोपीला मानपाडा पोलिसांनी सीसीटिव्हीच्या आधारे अटक केली आहे.

या आरोपीने मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेले ६ गुन्हे आणि टिळक नगर हद्दीत केलेला १ गुन्हा उघडकीस आला असून ७१२ ग्रॅम सोने आणि २५८ ग्रॅम चांदी असे एकूण ३६ लाख रुपयांचा मुद्देमाल मानपाडा पोलिसांनी हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे हा गुन्हेगार दिवसाढवळ्या चोरी करत होता. ज्या इमारतीला वॉचमन नाही अशा इमारती तो हेरून त्यामध्ये तो चोरी करायचा.

चोरी करण्यासाठी मुंबई येथून तो डोंबिवली येथे ट्रेनने येत असे. नवीन पद्धतीचे ल्याच न तोडता जुन्या पद्धतीचे कुलूप असलेली घरे हेरून त्याच्याकडे असलेल्या हत्यारातून तो कुलूप तोडत होता. तो स्वतः सुरुवातीला सोने गाळण्याच्या व्यवसायामध्ये होता. मात्र त्या व्यवसायात नुकसान झाल्याने त्याने दहा वर्षापासून सोने चोरीचा मार्ग त्याने स्वीकारला होता. अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील कुऱ्हाडे, मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, अनिल पडवळ त्यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी ही कामगिरी केली असून गेल्या पंधरा दिवसातील त्यांची ही दुसरी कारवाई आहे.

Back to top button