कुरकुंभ एमआयडीसीमधील हारमोनी ऑरगॅनिक्स कंपनीत चोरी | पुढारी

कुरकुंभ एमआयडीसीमधील हारमोनी ऑरगॅनिक्स कंपनीत चोरी

कुरकुंभ : पुढारी वृत्तसेवा; कुरकुंभ (ता. दौंड) एमआयडीसीमधील कंपन्यातून केमिकल चोरीचे सत्र अद्याप सुरूच आहे. हारमोनी ऑरगॅनिक्स प्रा लि कंपनीतून ४७ लाख २७ हजार २५० रूपयांचे केमिकल चोरी झाले आहे. यापूर्वी तीन कंपन्यातून मिळून ६ कोटी ८ लाख २६ हजार २४६ रूपयांचे केमिकल चोरीला गेले असून चार महिन्यांत हारमोनीमधील चोरीची ही चौथी घटना आहे.

याबाबत कंपनीचे स्टोअर्स मॅनेजर दिपक मोतीराम चौधरी (वय ५६, रा. भिगवण रोड इनामदारनगर, पांडूरग प्रेस्टीज फ्लॅट नं ३६, बारामती) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूध्द दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार रविवार (दि. २६ जून) रात्री ते सोमवार (दि. २७ जून) सकाळ यादरम्यान घडला.

हारमोनी कंपनीत पॅलेडियम कॅटॅलिस्ट साधारण २६ किलो व कॅटॅलिस्ट १०१ नावाचे १७ किलो वजनाचे केमिकल वेगवेगळे सीलबंद डब्यात ठेवले होते. हे केमिकल मागणीप्रमाणे उत्पादन विभागाला पुरवले जाते. त्यामधील १.२०६ किलो ग्रॅम केमिकल पुरवठा विभागाला दिले. उर्वरित २६ किलो केमिकल निळ्या रंगाच्या ड्रममध्ये प्लास्टीक पिशवीत ठेवले होते. दुसऱ्यावेळी पुन्हा हे केमिकल उत्पादन विभागाला लागणार होते. केमिकल ठेवल्या ठिकाणी गेले असता केमिकल दिसून आले नाही. या केमिकलची शोधाशोध करीत असताना कॅटॅलिस्ट १०१ नावाचे १७ किलो केमिकल देखील दिसून आले नाही. त्यामुळे केमिकल चोरी झाल्याचे उघडकीस आले.

Back to top button