नागपूर : भटक्‍या कुत्र्यांच्या हल्‍ल्‍यात ५ वर्षीय बालकाचा मृत्‍यू; ओढत नेत लचके तोडले | पुढारी

नागपूर : भटक्‍या कुत्र्यांच्या हल्‍ल्‍यात ५ वर्षीय बालकाचा मृत्‍यू; ओढत नेत लचके तोडले

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : भटक्या कुत्र्यांनी एका पाच वर्षीय बालकाचे लचके तोडल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना आज (शनिवार) सकाळी जिल्ह्यातील काटोल येथे उघडकीस आली. या घटनेने संताप व्यक्त होत असून, भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पुढे येत आहे. केवळ काटोलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. रात्री बेरात्री ड्यूटी करून जाणाऱ्यांनाही या कुत्र्यांचा चांगलाच त्रास होतो. त्‍यामुळे नागरिकांकडून भटक्‍या कुत्र्यांची नसबंदी करण्याची मागणीही अनेकवेळा करण्यात आली आहे.

या विषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शनिवारी सकाळी हा लहान मुलगा त्याच्या बहिणीसोबत फिरायला गेला होता. दोघेही घराजवळच्या रस्त्याच्या कडेने फिरत होते. याच दरम्यान भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी कुत्र्यांनी त्‍या मुलाला ओढतच एका बांधकामाधीन जागेवर नेले. तिथे त्याचे लचके तोडत त्‍याला गंभीर जखमी केले. त्यात मुलाचा मृत्यू झाला. विराज राजू जयवार हे मृत बालकाचे नाव आहे.

पाच वर्षीय विराज रोजच आपल्या मोठ्या बहिणीसोबत फिरायला जात होता. आज सकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान तो नेहमी प्रमाणे बहिणीसोबत फिरायला निघाला. त्याच वेळी भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. ते पाहून बहिणीने मोठमोठ्याने ओरडत लोकांना मदतीची विनंती केली. परंतु लोकांना तिचा आवाज ऐकू गेला नाही. तोपर्यत कुत्र्यांनी बालकाला ओढत एका बांधकामाधीन ठिकाणी नेले व तिथे लचके तोडीत त्‍याला गंभीर जखमी केले. त्यात त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. काटोलमधील धंतोली या पॉश परिसरात ही घटना घडली. त्याचे वडील राजू जयवार शेतकरी असल्याचे समजते.

हे ही वाचलंत का? 

Back to top button