डुकराच्या मेंदूत बसवली मायक्रो चिप! | पुढारी

डुकराच्या मेंदूत बसवली मायक्रो चिप!

वॉशिंग्टन : ‘स्पेस एक्स’चे संस्थापक एलन मस्क यांनी मेंदू ‘वाचणारी’ चिप सादर केली आहे. एखाद्या नाण्याच्या आकाराची ही चिप असून ती गेरट्रूड नावाच्या एका डुकराच्या मेंदूत बसवण्यात आली आहे. त्याच्या मेंदूतील हालचाली यामुळे कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर पाहायला मिळतात. 

ही चिप मेंदूला कॉम्प्युटरशी जोडण्याचे काम करते. मस्क यांनी लाईव्ह स्ट्रीमद्वारे ही चिप कसे काम करते हे दाखवले. चिप लावलेल्या डुकराने आपले खाद्य खाण्यास सुरुवात करताच त्याच्या मेंदूतील हालचाली कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसून येऊ लागल्या. मस्क यांची एक स्टार्टअप कंपनी ‘न्यूरोलिंक’ यावर वर्षभरापासून काम करीत होती. वर्षभरापूर्वी एका उंदरावर अशा चिपचा प्रयोग करण्यात आला होता. त्यावेळी केवळ उंदराच्या डोक्यात यूएसबीशी निगडीत असलेल्या या चिपचा फोटो समोर आला होता. त्यानंतर माकडांवरही असाच प्रयोग करण्यात आला. आता मानवावरही अशी चाचणी घेण्याची योजना आहे. या उपकरणाचा वापर स्मरणशक्ती वाढवणे, ब्रेन स्ट्रोक किंवा तत्सम न्यूरॉलॉजिकल आजारांवरील उपचारासाठी होऊ शकतो. लकवाग्रस्त व्यक्तींनाही ही चिप लाभदायक ठरू शकते. अतिशय पातळ असलेल्या या चिपमध्ये एक हजार तारा आहेत. या तारांची रुंदी मानवी केसांच्या दहाव्या हिश्श्याइतकी आहे.

संबंधित बातम्या
Back to top button