अक्‍कलदाढ येताना वेदना होताहेत? | पुढारी | पुढारी

अक्‍कलदाढ येताना वेदना होताहेत? | पुढारी

डॉ. निखिल देशमुख

आपल्यापैकी बहुतेकांना 17 ते 21 वर्षे वयात अक्‍कलदाढ येते. हा अनुभव इतर दातांच्या तुलनेत अतिवेदनादायी असतो. अनेकांना वयाच्या पंचवीशीनंतरही अक्‍कलदाढ येते. हे दात खूप मजबूत असतात. त्यामुळे ते येण्यास खूप उशीर होतो.

आपल्या जबड्यामध्ये 28 दात असतात आणि संपूर्ण जबड्यात हे दात आपली जागा व्यापून घेतात; पण अक्‍कल दाढा मात्र खूप उशिरा येतात. त्यामुळे जबड्यात त्यांना येण्यास जागा राहिलेली नसते, त्यामुळेच अक्‍कलदाढ येताना खूप वेदना होतात. त्याचबरोबर हिरड्यांवर दाब येतो. त्यामुळेच दातात वेदना, हिरड्या सुजतात आणि वेदना होतात. ही नैसर्गिक प्रक्रिया असते ती प्रत्येकाबरोबर होतेच. अक्‍कल दाढेच्या वेदना कधीही होऊ शकतात. एक दोन दिवस या वेदना होत राहतात. 

संबंधित बातम्या

दातात वेदना झाल्यास दात घासताही येत नाहीत. तसेच श्‍वासाला दुर्गंधी येते, त्यानंतर दात किडण्याच्या समस्याही होतात. दातांच्या वेदनेपासून मुक्‍तता हवी असेल तरकाही घरगुती उपाय जरूर करून पाहावे. 

लवंग : दाताच्या वेदनांसाठी बहुतेक लोक लवंगांचा वापर करतात. लवंग दातामध्ये दाबून धरल्यास वेदना कमी होण्यास मदत होते. लवंगेत अ‍ॅनस्थेटिक आणि अ‍ॅनलगेसिक गुण असतात, त्यामुळे वेदना दूर होण्यास मदत होते. दिवसातून दोन तीनवेळा लवंग दाताखाली धरावी आणि त्या दरम्यान काही खाऊ नये. 

मीठ : मिठाचा वापर केल्यास फायदा होतो. वेदना दूर करण्यासाठी कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या कराव्यात. ते पाणी तोंडात धरून शेकवा. दातामध्ये होणारा संसर्ग दूर होतो आणि वेदनांपासून मुक्‍तता मिळते. सकाळी दात घासताना देखील मिठाच्या पाण्याचा वापर करावा. 

लसूण : यामध्ये जीवाणूप्रतिरोधक गुण असतात, शिवाय त्यात प्रतिजैविक, दाह कमी करण्याचे आणि इतर औषधी गुण असतात. त्यामुळे अक्‍कल दाढ येतानाच्या वेदना कमी होतात. लसूण सोलून त्याच्या पाकळ्या लावल्या तर दातांच्या वेदनेत आराम मिळतो. दिवसातून दोनवेळा दोन दोन लसणाच्या पाकळ्या चावून खाल्ल्यास दाताच्या वेदना कमी होतात. 

हिंग : हिंगामध्ये अनेक आयुर्वेदिक गुण आहेत. त्यात दाह कमी करणारे, अँटिसेप्टिक गुण असतात त्यामुळे दातांच्या वेदनांपासून मुक्‍ती मिळते. अगदी थोडा हिंग घेऊन तो दातांला होणार्‍या वेदनांच्या जागी लावावा किंवा एक चतुर्थांश पाण्यात हिंग मिसळून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. 

कांदा : दाताच्या वेदनांसाठी कांदा जादूगार आहे. त्याच्या वापराने दाताच्या वेदनांपासून आराम मिळेल. कांदा कच्चा खाल्ल्यास दातांच्या वेदनांपासून आराम मिळतो; पण दातांना होणार्‍या वेदनांमुळे कांदा कच्चा खाऊ शकत नसाल तर त्याच रस काढून लावावा. 

पेरूची पाने : पेरूची कोवळी पाने तोडून स्वच्छ धुवून घ्या आणि दुखणार्‍या दाताखाली ती पाने दाबावीत. त्यामुळे दाताच्या वेदना कमी होतात. दर दिवशी चारवेळा ही पाने चावल्यास खूप आराम मिळतो. शक्य असल्यास ही पाने एक कप पाण्यात उकळून त्या पाण्याने माऊथवॉश सारख्या गुळणा कराव्यात. 

Back to top button