दोडामार्ग : तिलारी नदीत बुडून मामा, भाचीचा मृत्यू | पुढारी

दोडामार्ग : तिलारी नदीत बुडून मामा, भाचीचा मृत्यू

दोडामार्ग ; पुढारी वृत्तसेवा : कुडासे-वानोशीवाडी येथील तिलारी नदीपात्राच्या दसई भागात चार जण बुडाल्याची धक्कादायक घटना घडली. पैकी दोघांना वाचविण्यात यश आले असून या दुर्घटनेत मामा-भाची या दोघांचा बुडून मृत्यू झाला. गोव्याचे वकील विजय आनंद पाळयेकर (मामा, 55 वर्षे) व तनीषा ठाकूर (भाची, 13 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. ही घटना शनिवारी सकाळी 11:30 वा.च्या सुमारास घडली.

ते कुडासे येथील त्यांच्या पाहुण्यांकडे आले होते. घटनेची माहिती वरिष्ठ पोलिसांना कळताच उपविभागीय अधिकारी डॉ. रोहिणी सोळंकी यांनी सायंकाळी घटनास्थळी भेट दिली.

गोवा राज्यातील ताळगाव-दुर्गावाडी येथील अ‍ॅड. विजय पाळयेकर हे कुटुंबीयांसह सुमारे 20 जण त्यांचे कुडासे येथील पाहुण्यांकडे आले होते. शनिवारी सकाळी मौजमजा करण्यासाठी ते तिलारी नदीपात्रात गेले. त्यापैकी काहीजण आंघोळीसाठी नदीपात्रात उतरले. त्यातील चार जण अचानक पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाऊ लागले. यात विजय पाळयेकर, तनिषा ठाकूर व इतर दोघींचा समावेश होता. बुडणार्‍यांंनी बचावासाठी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. नदीपात्रावर असलेल्या नातेवाईकांनी हे दृश्य पाहताच त्यांनीही टाहो फोडला. आरडाओरड ऐकून शेजारील ग्रामस्थांनी नदीपात्राकडे धाव घेतली. मात्र तत्पूर्वी विजय पाळयेकर यांनी कसेबसे दोघींना पाण्याबाहेर काढले. मात्र त्यांची भाची पाण्यात बुडत होती. त्यामुळे लागलीच त्यांनी भाची तनिषा ठाकूर हिला वाचविण्यासाठी पाण्यात उडी घेतली. ते पोहोण्यात तरबेज नसल्याने भाचीला वाचवणे त्यांना अशक्य झाले. दुर्दैवाने यात तेसुद्धा बुडाले. त्यांना ग्रामस्थांनी बाहेर काढले. या दरम्यान तनिषा ठाकूर पाण्यात गायब झाली, तब्बल पाऊण तासानंतर तिच्या अंगावरील वस्त्रे पाण्यावर तरंगू लागल्याचे दिसताच ग्रामस्थांनी तिला बाहेर काढले.

नातेवाइकांनी बुडालेल्यांना तात्काळ पेडणे येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच विजय पाळयेकर व तनिषा ठाकूर यांचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगितले. या दुर्घटनेची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना कळताच सावंतवाडीच्या डीवायएसपी डॉ. रोहिणी सोळंकी यांनी सायंकाळी घटनास्थळी पाहणी केली. यावेळी दोडामार्ग पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी, अनिल पाटील, रामचंद्र मळगावकर व इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

कदाचित वाचले असते?

विजय पाळयेकर व तनिषा ठाकूर यांना नदीतील पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर नातेवाईकांनी त्या दोघांनाही घेऊन पेडणे रुग्णालय गाठले. दरम्यान, त्यांनी कुडासे ते पेडणे असा पाऊण तासांचा प्रवास केला. मात्र, केवळ दहा ते पंधरा मिनिटांचा प्रवास करून त्या दोघांना दोडामार्गातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असते तर ते कदाचित वाचले असते!

वकिलाचा दुर्दैवी अंत

या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. विजय पाळयेकर हे गोव्यातील प्रसिद्ध वकील आहेत. ते दुर्गावाडी-ताळगाव येथील छत्रपाल दामोदर देवस्थानचे माजी अध्यक्ष होत. सांस्कृतिक कलेत त्यांचे प्राविण्य होते. तर सामाजिक उपक्रमात ते हिरीरीने भाग घेत असत. त्यांच्या निधनाने त्यांच्या मित्र परिवारात मोठी शोककळा पसरली आहे.

Back to top button