कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील दोन जवानांना वीरमरण; लडाखमध्ये बस नदीत कोसळून ७ सैनिकांचा मृत्यू | पुढारी

कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील दोन जवानांना वीरमरण; लडाखमध्ये बस नदीत कोसळून ७ सैनिकांचा मृत्यू

लेह : वृत्तसंस्था लडाखमधील तुर्तक सेक्टरमधील श्योक नदीत खासगी बस कोसळल्याने या बसमधून जाणारे सात जवान शहीद झाले, तर 19 जवान जखमी झाले आहेत. शुक्रवारी सकाळी 9 वाजता हे 26 जवान खासगी बसने परतापूर येथून हनीफ सब सेक्टरच्या फॉरवर्ड पोस्टवरील मोर्चा सांभाळण्यासाठी रवाना झाले होते. शहीद झालेले सातही जवान महाराष्ट्रातील असल्याचे सांगण्यात आले असून त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजचा प्रशांत शिवाजी जाधव (वय 27) आणि सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांचा समावेश आहे.

दहशतवाद्यांची नजर चुकविण्यासाठी लष्करी जवान खासगी बसने जात होते. थोईसेपासून 25 किलोमीटर अंतरावर ही बस चालकाचा ताबा सुटल्याने घसरली आणि नदीत कोसळली. सर्व जवानांना जखमी अवस्थेत चंडीमंदिर कमांड रुग्णालयात आणले गेले. यापैकी 7 जवानांना मृत घोषित करण्यात आले. लेहहून परतापूरकडे सर्जिकल पथक रवाना करण्यात आले आहे. गंभीर जखमींना हवाई दलाच्या मदतीने वेस्टर्न कमांडच्या रुग्णालयात पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व जवान महाराष्ट्रातील असल्याचे सांगितले जात आहे. तथापि इतर जवानांची माहिती मिळू शकली नाही.

आम्ही सर्व जखमी जवानांना सर्वोत्तम उपचार उपलब्ध होईल, असा प्रयत्न करत आहोत. सर्व जखमी जवान लवकरात लवकर बरे व्हावेत व पूर्ववत देशसेवेसाठी सज्ज व्हावेत असाच आमचा प्रयत्न आहे, असे भारतीय लष्कराकडून सांगण्यात आले. इतर मृत व जखमी जवानांची नावे अद्याप उपलब्ध झालेली नाहीत. तथापि जखमी जवानांमध्ये महाराष्ट्रातील काही जण असल्याचे सांगण्यात येते.

गडहिंग्लज तालुक्यावर शोककळा : प्रशांत जाधव यांचे पार्थिव आज येणार 

हलकर्णी :  लडाखच्या तुर्तक सेक्टरमध्ये भारतीय लष्कराची बस नदीत कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत कोल्हापूर जिल्ह्यातील बसर्गे बुद्रुक (ता. गडहिंग्लज) येथील जवान प्रशांत शिवाजी जाधव (वय 27) यांंना वीरमरण आल्याचे समजताच तालुक्यावर शोककळा पसरली. दरम्यान, जाधव यांचे पार्थिव शनिवारी (दि. 28) खास विमानाने बेळगाव येथे येणार असून, बसर्गे या मूळ गावी पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. शोकमग्न ग्रामस्थांनी शुक्रवारी सायंकाळपासून चबुतरा उभारण्यास सुरुवात केली होती.

प्रशांत हे सन 2014 मध्ये बेळगाव येथे 22 मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये भरती झाले होते. शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास ते आपल्या बटालियनसह लष्करी वाहनातून परतापूरहून उपसेक्टर हनिफकडे जात होते. यावेळी त्यांची बस खोल दरीतील श्योक नदीत कोसळली. या अपघातात प्रशांत यांचा मृत्यू झाल्याची बातमी दुपारी गावात पोहोचली. त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताने कुटुंबीयांना धक्काच बसला.
प्रशांत यांचा विवाह जानेवारी 2020 मध्ये झाला होता. त्यांना अकरा महिन्यांची मुलगी आहे. पत्नी पद्मा व मुलगी नियती हिच्यासह ते जामनगर (गुजरात) येथे दोन महिन्यापूर्वी वास्तव्यास होते. गावी वडील शिवाजी व आई रेणुका असा परिवार आहे. दरम्यान, बसर्गे येथे तरुण मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने अंत्यसंस्कारासाठी चबुतरा उभारण्याचे काम सायंकाळी सुरू करण्यात आले होते.

विसापुरात उद्या अंत्यसंस्कार : सुभेदार विजय शिंदे पार्थिव रविवारी येणार 

खटाव :भारतीय लष्कराची बस नदीत कोसळून झालेल्या अपघातात विसापूर (ता. खटाव) येथील सुभेदार विजय सर्जेराव शिंदे यांचा मृत्यू झाला. देशसेवा बजावताना त्यांना वीरमरण आले आहे. यामुळे विसापूरसह खटाव तालुका शोकसागरात बुडाला आहे. शिंदे यांचे पार्थिव रविवारी (दि. 29) विसापूर येथे आणले जाणार आहे. तिथेच शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

विजय सर्जेराव शिंदे हे 1998 मध्ये 22 मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये रुजू झाले होते. 24 वर्षांच्या कालावधीत त्यांनी लष्करात विविध ठिकाणी सेवा बजावली. विसापूर गावाला सैनिकी परंपरा आहे. विजय शिंदे यांचे वडील सर्जेराव शिंदे लष्करात होते तर मोठे बंधू प्रमोद शिंदे हे लष्करात पॅरा कमांडो म्हणून कार्यरत आहेत. सध्या विजय शिंदे यांचे पोस्टिंग लेह लडाख येथे होते. वीर जवान विजय यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुली, दोन भाऊ असा परिवार आहे.

Back to top button