suicide in hingoli : मुलांना दुचाकीवर बसवून शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या | पुढारी

suicide in hingoli : मुलांना दुचाकीवर बसवून शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या

हिंगोली ; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील पिंपळदरी शिवारामध्ये दोन मुलांना रस्त्यात दुचाकीवर थांबवून शिक्षकाने बाजूला जाऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (suicide in hingoli ) केली. ही घटना गुरुवारी दुपारी उघडकीस आली. लोडबा रामा गायकवाड (वय ३७, रा. गाडी बोरी, ता. हिंगोली) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, लोडबा गायकवाड हे जालना जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. शाळेला सुट्टी असल्यामुळे ते त्यांच्या मूळ गावी गाडीबोरी येथे आले होते. गायकवाड हे आज सकाळी त्यांच्या दुचाकीवरून दोन मुलांना बसवून भटसावंगी येथे सासरवाडीला सोडण्यासाठी निघाले होते. रस्त्यामध्ये पिंपळदरी शिवारात दुचाकी थांबवून त्यांनी दोन्ही मुलांना दुचाकीवर बसण्यास सांगितले. त्यानंतर गायकवाड यांनी बाजूला पिंपळदरी शिवारात जाऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (suicide in hingoli) केली. दरम्यान, बराच वेळ होऊन वडील परत आले नसल्यामुळे मुले रडू लागली.  रस्त्याने जाणार्‍या काही शेतकर्‍यांनी पाहिला त्यांनी मुलांकडे विचारणा केली असता मुलांनी त्यांचे वडील लघुशंकेला गेल्याचे सांगितले.

त्यानंतर शेतकर्‍यांनी परिसरात जाऊन पाहणी केली असता लोडबा गायकवाड यांचा मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. याची माहिती मिळाल्यानंतर बासंबा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुरेश भोसले, जमादार नाना पोले यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दरम्यान मृत गायकवाड यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. गायकवाड यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

Back to top button