धुळे : बिबट्याने पाडला दोन वर्षांच्या वासरीचा फडशा, धमनार शिवारातील घटना | पुढारी

धुळे : बिबट्याने पाडला दोन वर्षांच्या वासरीचा फडशा, धमनार शिवारातील घटना

धुळे (पिंपळनेर) पुढारी वृत्तसेवा

साक्री तालुक्यातील धमनार शिवारातील दोमदेर परिसरात असलेल्या एका शेतकऱ्याच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला करून वासरीचा फडशा पाडल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे.

म्हसदी येथील दिगंबर मोतीराम चिंचोरे (वाणी) यांची दोमदेर शिवारात बागायती शेती आहे. याच शेतात गुरांचा वाडा आहे. या वाड्यावर मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून दोन वर्षाच्या वासरीचा फडशा पाडला. वाड्याच्या शेजारी असलेल्या खोलींमध्ये शेतमालक व मुलगा झोपलेला होता. कुठलीही चाहूल लागू न देता बिबट्याने वाड्यावर हल्ला केला. वासरीला उचलून वाड्याच्या बाहेर नेले. सकाळी चिंचोरे यांचा मुलगा बंडू हा गुरांच्या वाड्याकडे गेल्यावर ही घटना लक्षात आली.

त्यानंतर शेतमालक चिंचोरे यांनी या घटनेची खबर वन विभागाला दिली. वन विभागाचे वनरक्षक एल.आर.वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. यावेळी परिसरातील शेतकऱ्याने बिबट्याच्या बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे केली. चिंचोरे यांच्या शेतातील ही दुसरी घटना असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा :

Back to top button