लोक चपलेनं मारतील हे मुख्यमंत्र्यांना सांगावं लागलं यामध्येच सगळं आलं : संजय राऊत | पुढारी

लोक चपलेनं मारतील हे मुख्यमंत्र्यांना सांगावं लागलं यामध्येच सगळं आलं : संजय राऊत

मुंबई; पुढारी ऑनलाईन : शिवसेना कोणत्याही लढाईसाठी तयार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. अंगावर आल्यास शिंगावर घेऊ ही शिवसेनेची भूमिका असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसने गोंधळातून बाहेर पडून मग स्वबळाची भाषा बोलावी असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

अधिक वाचा : आपला आधार क्रमांक दुसऱ्याला माहीत झाल्यास बँक खाते हॅक होऊ शकते का?

एक स्वबळाची भाषा करतो आणि एक एकत्र येण्याची भाषा करतो असा टोमणाही त्यांनी हाणला. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (ता.१९) सेनेच्या वर्धापनदिनी केलेल्या भाषणाचा संदर्भ देत म्हणाले की, लोक चपलेनं मारतील हे मुख्यमंत्र्यांना सांगावं लागलं यामध्येच सगळं आलं. राजकारण बाजूला ठेवून कोरोनाकडे लक्ष द्या हा त्यामागील उद्देश होता. विरोधकांची पोटदुखी नेहमीचीच असल्याची टीका त्यांनी केली. 

अधिक वाचा : स्वबळावरून रंगली जुगलबंदी! मुख्यमंत्र्यांनी दिल्या कानपिचक्या

दरम्यान, संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरातून मोदी सरकारवर तोफ डागली आहे. ते आपल्या लेखात म्हणतात की, अयोध्येत राममंदिराच्या जमीन खरेदीवरून वादंग माजले आहे. संजय सिंह हे आप पक्षाचे खासदार. त्यांनी एक प्रकरण समोर आणले. एक जमीन अयोध्येतील, जी दोन-पाच मिनिटांपूर्वी फक्त दोन कोटी रुपयांत खरेदी केली. त्याच जमिनीची किंमत पुढल्या पाच मिनिटाला १८ कोटी रुपये दाखवून राम जन्मभूमी न्यासाने खरेदी केली. हा राममंदिराचा जमीन घोटाळा असल्याचे संजय सिंह यांनी समोर आणले.

अधिक वाचा : २०२४ मध्ये काँग्रेसचाच मुख्यमंत्री : पृथ्वीराज

या सर्व प्रकरणाची सखोल चौकशीची मागणी शिवसेनेसह अनेकांनी केली. संजय सिंह यांच्या दिल्लीतील घरावर भाजपा कार्यकर्त्यांनी हल्ला केला. मुंबईत शिवसेना भवनावर मोर्चा काढून छाती पिटण्याचा कार्यक्रम पार पाडला. अयोध्येतील जमीन घोटाळ्याच्या चौकशीची जे मागणी करीत आहेत ते हिंदुद्रोही, राजद्रोही वगैरे ठरवून मोकळे झाले. ही एक प्रकारची विकृती आहे. धार्मिक स्थळांबाबत घोटाळ्यांची चौकशी करा असे सांगणाऱ्यांना राष्ट्रद्रोही म्हणणे ही विकृती आहे. ही रामनिष्ठा नसून राजनिष्ठा आहे. याच्याशी देशभक्तीचा काडीमात्र संबंध नाही. 

Back to top button