इतिहास : ताजमहाल कुणाचा? | पुढारी

इतिहास : ताजमहाल कुणाचा?

संजय सोनवणी

मुमताज महल तिच्या चौदाव्या अपत्याला जन्म देताना 17 जून 1631 ला बुर्‍हाणपूर इथं वारली. दारा शुकोह, औरंगजेब ते शाहजहानची लाडकी लेक जहाँआरा बेगम ही तिची आजही इतिहासात स्थान मिळवून बसलेली अपत्ये. बुर्‍हाणपूर इथं तिला तात्पुरतं दफन करण्यात आलं. आगर्‍यात तिच्यासाठी कायमच भव्य मकबरा बनवायची योजना असल्याने शाहजहाननं राजा जयसिंगाकडून यमुनाकाठची त्याची हवेली चार हवेल्यांच्या मोबदल्यात विकत घेतली.

शाहजहानच्या ‘फर्माना’त, कझ्विनी आणि लाहोरीच्या ‘पातशहानामा’त या व्यवहाराचा, ही जागा घेण्यामागच्या हेतूचा, म्हणजे भव्य आणि शानदार मकबरा बांधण्याचा स्पष्ट उल्लेख आहे. ही जागा 42 एकरात असून, त्यात निवासी हवेली म्हणजेच मंजील किंवा खाना होती, असंही त्यावरून दिसते. याच जागेवर ‘ताजमहाल’चं बांधकाम करण्यात आले, की जुन्या वास्तूलाच सुशोभीकरण करून फक्‍त नाव बदलण्यात आलं? याबद्दल मोठा विवाद आहे.

मूळ मालकी राजा मानसिंगाची

पु. ना. ओक, भट-आठले प्रभुतींनी मानसिंगाच्या मूळच्याच बांधकामाला संगमरवरी आच्छादन देत ताजमध्ये बदलवलं, अशा अर्थाचे निष्कर्ष काढलेत. ओकांच्या मते, ‘तर तिथं तेजोमहालय नावाचं शिवालयच होते’ या वादाला तेव्हापासून सुरुवात झाली, तो आजही शमायला तयार नाही. त्या वादात जायचं कारण नाही. आपल्याला मुळात ‘ताजमहाल’ म्हणजे मूळच्याच इमारतीची डागडुजी आणि सुशोभीकरण आहे, की संपूर्णतः नवे बांधकाम आहे, याची इथं चर्चा करायची आहे. याबद्दल शंका नाही, की ‘ताजमहाला’ची जागा मूळची राजा मानसिंगाच्या मालकीची होती. यमुनेच्या दोन्ही काठांवर राजपूत आणि सरदारांच्या हवेल्या होत्या. 1626 मध्ये डच अधिकारी पेलासर्ट आणि डलात यांनी मानसिंगाच्या हवेलीचा उल्लेख करून ठेवलाय.

‘ताज’ची जागाही तीच आहे, हेही 1707 मधल्या एका नकाशावरून आणि पेलासर्टनं दिलेल्या यादीशी तुलना करून स्पष्ट होतं. ‘फर्मान’ आणि ‘पातशहानामा’ही या माहितीला पुष्टी देतो. या पुराव्यांवरून एकच गोष्ट सिद्ध होते आणि ती म्हणजे ताजची जागा आधी जयसिंगाच्या नावे होती. त्या जागेचा मूळ मालक मानसिंग असून, तिथं एक हवेली अथवा मंजील होती. या गोष्टी नाकारण्याचं काहीएक सयुक्‍तिक कारण नाही.

निवासी हवेलीची दुर्लक्षित जागा

मानसिंग हा बादशाही दरबारातला बलाढ्य हस्ती होता. त्यामुळे त्याची हवेली आगर्‍यात असणं स्वाभाविक होतं. जेव्हा शाहजहाननं हवेली ताब्यात घेतली तेव्हा राजा जयसिंग मात्र स्वत: त्या हवेलीत राहात होता की नाही, याचे कसलेही उल्लेख मिळत नाहीत. शाहजहाननं राहती हवेली विकत मागितली असती का? किंवा जयसिंगानं विकली असती का? या प्रश्‍नांचा कुठल्या इतिहासकारानं विचार केलेला दिसत नाही.

शाहजहानला हवेलीपेक्षा यमुनाकाठच्या त्या 42 एकरांच्या जागेत रस होता; हेही ‘फर्मान’ आणि ‘पातशहानामा’वरून सहज लक्षात येते. शिवाय त्या जागेवर अद्वितीय वास्तूचं अस्तित्व असतं, तर पेलासर्ट आणि डलातनं तिचा तसा उल्लेख केला असता. पण तसंही नाही. इतर राजपूत आणि सरदारांच्या हवेल्यांच्या जागांचं ते जसं वर्णन करतात तसंच मानसिंगाच्या जागेचंही वर्णन करतात. वास्तुरचनाशास्त्रद‍ृष्ट्या ती विशेष वेगळी इमारत असती, तर तिचा वेगळा उल्लेख येणं आणि ती तेव्हाही, भलेही संगमरवरी आच्छादन नसलं तरी प्रसिद्ध इमारत असती. पण ते वास्तव नाही. ती एक निवासी; पण दुर्लक्षित हवेलीच होती, एवढंच काय ते वास्तव अनेक पुराव्यांवरून पुढे येतं.
त्यामुळेच की काय, राजा मानसिंगच्या हवेलीचंच ‘ताज’मध्ये रुपांतरण करण्यात आलं! असा उल्लेख कुठंही मिळत नाही. मानसिंगची त्यावेळची प्रसिद्धी पाहता, जर असं झालं असतं, तर कुठं ना कुठं त्याचे उल्लेख मिळाले असते. शिवाय ‘पातशहानामा’तल्या नोंदी या मताला कसलीही पुष्टी करत नाहीत.

‘पातशहानामा’त या संदर्भातले जे उतारे आहेत, त्याचे वेगवेगळे अनुवाद प्रसिद्ध आहेत. माझे मित्र आनंद दाबक यांनीही एका स्वतंत्र पर्शियन अनुवादकाकडून अनुवाद करून घेतला होता आणि इतर अनुवादही तज्ज्ञांकडून तपासून घेतले होते. तो अनुवाद आणि ओकांनी दिलेला अनुवाद, याची तुलना करता हे लक्षात येतं, की ओकांनी आपल्या अनुवादात मोठा घोळ घातलाय. राजेंद्र जोशी यांनीही ओकांचा अनुवाद तपासून त्यात चूक आहे, असं स्पष्ट केलं होतं.

म्हणजे अंदाजित खर्च आणि होऊन गेलेला खर्च यात बहुधा जाणीवपूर्वक फरक करत त्यांनी आपला सिद्धांत मांडला. याचा अर्थ असा, की मानसिंगाच्या हवेलीचं रुपांतर डागडुज्या करून सध्याच्या ‘ताज’मध्ये करण्यात आलेलं नाही. मग मानसिंगाच्या हवेलीचं काय झालं? अर्थात, या प्रश्‍नाच्या उत्तराकडे वळण्याआधी आपण ‘ताज’संबंधी उपलब्ध असलेली इतर माहिती तपासून पाहूयात.

बांधकामाच्या निरीक्षणाची नोंद

फ्रेंच व्यापारी टॅवर्नियर हा 1638 ते 1668 या काळात सहा वेळा भारतात येऊन गेला. ‘ताजमहाल’वर 20,000 कामगार काम करत होते आणि ते पूर्ण व्हायला 22 वर्षं लागली, ही माहिती तो देतो. फ्रे सबास्टियन मनरिके हा पोर्तुगीज मिशनरी डिसेंबर 1640 ते जानेवारी 1641 या काळात आगर्‍यात होता. तो या बांधकामावर एक हजार लोक काम करत होते, असं लिहितो. हे लोक रस्ते, बागांचं काम करत होते असं तो लिहितो. पीटर मुंडी हा ब्रिटिश व्यापारी 1631 ते 1633 या काळात आगर्‍याला तीन वेळा राहिलाय. त्याला मुमताजचा मृत्यू झाल्याचं माहीत होतं. शेवटच्या भेटीच्या वेळीस त्यानं जे पाहिलं ते लिहिलंय. तो लिहितो, की ‘बांधकाम सुरू झालं असून, अत्यंत मोठ्या प्रमाणावर कामगार आणि धन वापरलं जात आहे. संगमरवर जणू एखादा सामान्य दगड असावा एवढ्या विपुलतेनं वापरला जातोय.’
अवास्तव आणि अपुरी माहिती टॅवर्नियर आगर्‍याला फक्‍त दोनदा आला होता.

पहिली आग्रा भेट 1640-41, तर दुसरी 1665 ची. ( (पान 1 वरून) म्हणजे त्यानं बांधकाम चालू असलेलं पाहिलं ते फक्‍त एकदा. बाकी जी माहिती त्याच्याकडे आहे ती सांगोवांगीची आहे, हे उघड आहे. त्यामुळे 20 हजार कामगार आणि 22 वर्षं ही एकतर अतिशयोक्‍तीत टाकून देता येतात किंवा त्याचा केवळ एक अंदाज म्हणून सोडून देता येतात. मनरिकेबद्दलही तसंच म्हणता येतं आणि मुंडीबद्दलही. मुळात हे प्रवासी नव्हते, तर व्यापारी होते. बांधकाम सुरू असताना एखादी इमारत पूर्ण झाल्यावर कशी दिसेल, याची कल्पना येण्याची शक्यता नाही. त्यामुळे कामगार संख्या अचूक का नाही, खर्चाचा ताळमेळ मग कसा बसत नाही याची गणितं अशा वर्णनांच्या आधारे करत मतं मांडणं गैर आहे. तिथले कामगार इतकी वर्षं जुन्या वास्तुचीच डागडुजी करत असते, तर मुंडीपासून असे उल्लेख सुरू झाले असते. पण तसं वास्तव नाही. वरील उल्लेखांवरून, ‘फर्माना’वरून आणि या लेखकांच्या वर्णनावरून एकच गोष्ट स्पष्ट होते आणि ती म्हणजे ‘ताजमहाला’च्या जागेवर नव्यानं बांधकाम चालू करण्यात आलं होतं आणि त्यासाठी अनेक मजूर, अभियंते आणि वास्तुतज्ज्ञ राबत होते.
मानसिंगाच्या हवेलीचं काय झालं?

मग मानसिंगाच्या मूळ वास्तूचं काय झालं? काही इतिहासकारांच्या मते, शाहजहाननं जयसिंगाकडून फक्‍त ‘जमीन’ घेतली होती. जमीन की मंजील याबाबत वाद झडलाय. तिथं मंजील किंवा हवेली असण्याचीच शक्यता आहे. त्या हवेलीत त्याकाळात कोणी राहत असल्याची शक्यता नाही. कदाचित त्यामुळेच शाहजहाननं ही जागा मागितली. जयसिंगानेही खळखळ न करता ही जागा देऊन टाकली आणि दुसरीकडे चार हवेल्या मिळवल्या. मानसिंगाची हवेली ‘ताज’सारखी भव्य आणि सुंदर वास्तू नव्हती. जर ती तशी असती, तर ती त्याच्या काळातच प्रसिद्ध झाली असती. पण तसं वास्तव नाही.

जुन्या बांधकामाचा वापर

‘ताजमहाल’च्या आराखड्याबद्दल तसंच नौकानयनासाठी असलेल्या यमुनातीरीच्या, आता गाळाखाली गेलेल्या धक्क्याचा उल्लेख गोडबोलेंनी केलाय आणि कबरीत त्याचं काय काम? असा प्रश्‍न विचारलाय. पण हा धक्‍का मूळचा मानसिंगच्या काळातलाच असणार, ही शक्यता त्यांनी विचारात घेतलेली नाही. ही मंजील कोणत्याही सरदाराची असावी तशीच होती आणि त्यात स्वभावत:च असावीत तशीच तळघरे, नौकानयनासाठीचे धक्के वगैरे बांधकाम असणं स्वाभाविक आहे आणि ती नष्ट करण्याचं कारणही नव्हतं. उलट मूळ तळघर कबरीसाठी वापरणं सोयीस्कर होतं. बाजूच्या खोल्या बंद करून आणि मधल्या भागात सुधारणा करून कबर बनवली गेली असावी, हे स्पष्ट आहे. बंद खोल्यांबद्दलचा विवाद अनाठायी असला तरी त्या जनतेसाठी उघडायला हरकत नाही.

थोडक्यात, मुख्य हवेलीचं मूळ बांधकाम पाडून ‘ताज’ची निर्मिती नव्यानं केली गेली असली, तरी मानसिंगाच्या हवेलीचे अवशेष काही प्रमाणात शिल्लक राहिलेत. त्यावरून संपूर्ण वास्तूचं श्रेय शाहजहानकडून काढून घेत काल्पनिक पात्रांना देण्याचं काही कारण नाही. ताजची वास्तुरचना स्वतंत्र असून, मूळच्या हवेलीतला काही भाग कल्पकतेनं त्यात समाविष्ट केला गेलाय असं म्हणणं अधिक सयुक्‍तिक आहे.

अपुर्‍या माहितीचा फटका

औरंगजेबाच्या घुमटाच्या दुरुस्तीबद्दलच्या 1652 च्या पत्राचा फार गवगवा केला जातो. औरंगजेबाचं पत्र सत्य मानून गळतीचा प्रश्‍न सोडवता येतो. एवढा मोठा घुमट बांधल्यानंतर त्यात मानवी चुकांमुळे तांत्रिक दोष राहू शकतात. गळती होऊ शकते. पण गळती झाली, दुरुस्ती करावी लागली म्हणजे ते बांधकाम पुरातन, हा तर्क चुकीचा ठरतो. मानसिंगाची 42 एकर जागा जयसिंगानं त्यावरच्या हवेलीसह विकली, ही वस्तुस्थिती आहे. त्यावर कोणतंही अलौकिक असं बांधकाम नव्हतं. जमिनीवरची मुख्य हवेली पाडून ही इमारत बांधली गेल्याचं स्पष्ट दिसतं. मुंडी ते टॅवर्नियर यांच्या वर्णनांत कामगारांच्या संख्येबाबत गफलत असली तरी बांधकामाची सुरुवात नव्यानं झाल्याची माहिती मिळते.

खुद्द ‘पातशहानामा’ आणि ‘शाहजहाननामा’ मानसिंगाकडून जागा घेऊन त्यावर ‘ताज’ची इमारत उभी करण्याची सुरुवात झाल्याचं नमूद करतात. उलट पु. ना. ओक ‘पातशहानामा’तल्या या संदर्भाच्या वर्णनात गफलत करतात, हे आपण वर पाहिलंय. ‘ताजमहाल’ पूर्ण होत आल्याचा काळ आणि राजकीय वादळी घडामोडी, शाहजहानचं आजारपण ते कैदेचा काळ दुर्दैवानं परस्परांशी भिडल्यामुळे त्याबाबतची माहिती धूसर होत गेली.

निरर्थक वादाला धार्मिक वळण

ताज’मधलं सोनं आणि इतर संपत्तीचं काय झालं? हा प्रश्‍न गोडबोलेंना पडला असला तरी सूरजमल जाटानं केलेल्या आग्रा स्वारीत ‘ताजमहाला’ची लूट केली होती, हा इतिहास ते विसरतात. त्याआधीही लूट झाली असण्याची शक्यता कशी नाकारता येईल? तसंही ‘ताज’वर विद्रुपीकरणाचं संकट 1857 च्या बंडाच्या वेळीही आलं होतं.

मुमताजच्या कबरीभोवती सोन्याचं रेलिंग होतं, असा उल्लेख पीटर मुंडी करतो. पण हे रेलिंग ‘ताज’च्या आवारातल्या तात्पुरत्या दफनस्थळाभोवती होतं. नंतर पुन्हा मुमताजचं शव हलवून आताच्या स्थानी दफन केल्यानंतर ते रेलिंग ठेवण्याची आवश्यकता नव्हती. त्यामुळे ते कुठं गेलं? हा प्रश्‍नही निरर्थक आहे. वास्तुरचना हिंदू की पर्शियन? हा वाद भोंगळ आहे. वास्तुरचनांमध्ये आणि त्यावरच्या कलाकारीत संस्कृती-संगम अपरिहार्यपणे होत असतो. मानसिंगाच्या जुन्या वास्तूतला काही भाग पाडायची गरज नसल्यानं तो तसाच राहिला. केवळ तळघर, बंद खोल्या यावरून फार मोठा दावा करण्यापेक्षा त्यांचं स्पष्टीकरण दुसरीकडे शोधायला हवे. ‘ताज’ हिंदूंचा की मुस्लिमांचा? हा वाद निरर्थक असून; तो ‘भारतीयांचा’ आहे, हेच लक्षात घ्यायला हवे.

Back to top button