Rajiv Gandhi assassination case : राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषी पेरारीवलनच्या सुटकेचे सुप्रीम कोर्टाचे आदेश | पुढारी

Rajiv Gandhi assassination case : राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषी पेरारीवलनच्या सुटकेचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राजीव गांधी हत्याकांडातील दोषी आणि त्यासाठी ३० वर्षांची जन्मठेपेची शिक्षा भोगलेल्या ए. जी. पेरारीवलन याची सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिले. घटनेतील कलम १४२ चा दुर्मिळपणे अवलंब करीत पेरारीवलन याच्या सुटकेचे आदेश दिले जात असल्याचे न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.

पेरारीवलन याची सुटका करण्याच्या अनुषंगाने तामिळनाडू राज्य सरकारने शिफारस करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला अनुसरून पेरारीवलन याची सुटका केली जात असल्याचे खंडपीठाकडून सांगण्यात आले. कलम १४२ हे विविध प्रकारच्या कराराच्या आदेशांचे (डीक्री) तसेच दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले खटले निकाली काढण्याशी संबंधित आहे.

गत ९ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने पेरारीवलन याचा जामीनअर्ज मंजूर केला होता. दीर्घकाळ शिक्षा भोगण्याबरोबरच पॅरोलवर असताना कोणतीही तक्रार न आल्यामुळे जामीन दिला जावा, असे पेरारीवलन याने अर्जात म्हटले होते. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची २१ मे १९९१ रोजी तामिळनाडूतील श्रीपेरुंबुदूर येथे बॉम्बस्फोट घडवून आणून हत्त्या करण्यात आली होती. मे १९९९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने पेरारीवलन, मुरुगन, संथन आणि नलिनी या चार दोषींची मृत्यूदंडाची शिक्षा कायम ठेवली होती. यानंतर फेब्रुवारी २०१४ मध्ये न्यायालयाने पेरारीवलन, संथन तसेच नलिनी यांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेचे जन्मठेपेत रूपांतरण केले होते. दयायाचिका निकाली काढण्यास केंद्र सरकारने ११ वर्षाचा वेळ घेतल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयाने दोषींची शिक्षा त्यावेळी सौम्य केली होती.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची २१ मे १९९१ रोजी तामिळनाडूच्या श्रीपेरुंबुदूर येथे हत्या (Rajiv Gandhi assassination case) करण्यात आली होती. या प्रकरणी पेरारिवलन याला ११ जून १९९१ रोजी अटक करण्यात आली. या घटनेच्या वेळी पेरारिवलन १९ वर्षांचा होता आणि तो गेल्या ३१ वर्षांपासून तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

सर्वोच्च न्यायालयाने राजीव गांधी यांच्या हत्येतील दोषी ए जी पेरारिवलन याच्या सुटकेचे आदेश दिल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी जोलारपेट्टाई येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर मिठाई वाटत आनंद साजरा केला.

Back to top button