सांगली : मनपा शाळांचा पट 1331 ने वाढला | पुढारी

सांगली : मनपा शाळांचा पट 1331 ने वाढला

सांगली; पुढारी वृत्तसेवा :  महानगरपालिका शाळा आता अंतर्बाह्य बदलत आहेत. गुणवत्ता व सोयीसुविधा वाढत आहेत. परिणामी दोन वर्षांत विद्यार्थी संख्या 1 हजार 331 ने वाढली आहे. महापालिकेच्या सर्व शाळांची झेप ‘मॉडेल स्कूल’च्या दिशेने सुरू आहे, अशी माहिती आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिली.

महानगरपालिकेच्या 50 शाळा आहेत. सन 2019-20 मध्ये या शाळांचा पट 4 हजार 869 होता, तो आता 6 हजार 200 झाला आहे. सध्या प्रवेश सुरू आहेत. विद्यार्थी संख्येत आणखी वाढ होणार आहे. या शाळांचे रुपडे बदलण्याचे महत्वाकांक्षी काम हाती घेण्यात आले आहे. डिजीटल क्लासरुम, संगणक कक्ष, प्रयोगशाळा कक्ष, शाळेची रंगरंगोटी, पडदे, मॅटिंग, विद्युत व्यवस्था, कंपाऊंड वॉल, गेट, पेव्हिंग ब्लॉक, मॉडेल स्कूल विकसित करणे, स्कूल बस, वाढीव इमारत, वाढीव वर्ग खोल्या, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अधिक प्रभावी केली जात आहे. पाल्यांनी आपल्या पाल्याचे प्रवेश महापालिका शाळेत घ्यावेत, असे आवाहन कापडणीस यांनी केले आहे.

दुरून येणार्‍यांसाठी सायकल बँक

महानगरपालिकेच्या शाळेत लांब अंतरावरून येणार्‍या मुलींसाठी सायकल बँक हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पहिली ते सातवीपर्यंत लांबून येणार्‍या मुलींसाठी सायकल दिली जाणार आहे. सातवी उत्तीर्ण होईपर्यंत सायकल मुलीकडे राहील. लांबून येणार्‍या विद्यार्थ्यांसाठी महापालिकेच्या काही शाळांनी रिक्षाची सुविधा उपलब्ध केली आहे. काही शाळांसाठी स्कूल बस उपलब्ध करण्याचाही विचार आहे. महापालिकेच्या मिरजेतील शाळा नंबर 19 चा पट 42 वरून 123 झाला आहे. पट संख्या वाढल्याने या शाळेला अधिक प्रोत्साहन म्हणून स्कूल बस उपलब्ध केली जात आहे, अशी माहिती कापडणीस यांनी दिली.

महानगरपालिका शाळांसाठी… !

  • महापालिकेच्या अंदाजपत्रकात शाळांसाठी 4 कोटींची तरतूद
  • डिजिटल क्लासरूम संगणक शिक्षण मुलींसाठी सायकल बँक
  • नृत्य, गायन, वादन प्रशिक्षण अतिरिक्त शिक्षण मोफत गणवेश
  • मोफत शैक्षणिक संच आरोग्य तपासणी, दरमहा मौखिक आरोग्य तपासणी
  • शाळांना अतिरिक्त स्कूल बस बालवाड्यांना खेळ साहित्यांचा संच

Back to top button