Satara : ‘एकवीस-झिरो; आबा-काका हिरो’ | पुढारी

Satara : ‘एकवीस-झिरो; आबा-काका हिरो’

सातारा पुढारी वृत्तसेवा :

किसनवीर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत आ. मकरंदआबा व नितीनकाका या जोडगोळीने अक्षरश: धमाल केली. सर्वच्या सर्व एकवीस जागांवर कारखाना बचाव पॅनलने जिंकल्यानंतर समर्थकांनी जोरदार जल्लोष केला. या आनंदोत्सवात ‘एकवीस झिरो ; आबा -काका हिरो’ अशी आरोळी घुमली. अवघा आसमंत दणाणून गेला. आबा-काका यांच्यावर शेतकरी सभासदांनी प्रचंड विश्वास दाखवला.

निवडणूक निकालांनतर कार्यकर्ते तर बेभान झाले. या जल्लोषी वातावरणाची टिपलेली ही क्षणचित्रे.

 

योग्य नियोजनामुळे मतमोजणी गतीने

तब्बल 154 मतपेट्या असल्याने मतमोजणी प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी यांनी योग्य नियोजन केले होते. त्यामध्ये त्यांना सहाय्यक निबंधक जे. पी. शिंदे, एन. रूपनवर, जी. खामकर, शंकर पाटील, सौ. प्रिती काळे, संदिप जाधव, देवीदास मिसाळ, उमेश उंबरदंड, गणेश देशमुख यांच्यासह 350 कर्मचारी राबत होते. योग्य नियोजन आणि समन्वय राखल्यामुळेच ही मतमोजणी प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यात सहकार विभागाला
यश आले.

मतमोजणी कर्मचारी घामाघूम

किसनवीर कारखान्याची मतमोजणी वाईच्या एमआयडीसीतील श्रीनिवास मंगल कार्यालयात सकाळी साडे आठ वाजता सुरू झाली. मात्र, जसजशी वेळ पुढे सरकु लागली तसतसा मतमोजणी प्रतिनिधी व मतमोजणी कर्मचारी यांना घामटा फुटू लागला. मंगल कार्यालयात असलेल्या फॅनची हवाच लागत नसल्याने कर्मचार्‍यांच्या अंगातून घामाच्या धारा सुटल्या होत्या. शिवाय अन्य कोणतीही व्यवस्था नसल्याने दिवसभर घामाघूम वातावरणातच कर्मचार्‍यांना मतमोजणी करावी लागली.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

किसनवीर कारखान्यासाठी यंदा मकरंद पाटील व मदनदादा भोसले गट यांच्यात टस्सल झाली होती. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मतमोजणी केंद्रांवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतमोजणीच्या ठिकाणापासून 100 मीटर अंतरावर कोणत्याही पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांना प्रवेश दिला जात नव्हता. तसेच मतमोजणी केंद्रातही मोबाईल देण्यास बंदी लावण्यात आली होती.

शेतकर्‍यांचा रोष मतपेटीतून प्रकट

दोन वर्षे कारखाना सुरू होवू न शकल्याने लाखो टन ऊस तसाच उभा राहिला. तसेच थकलेली एफआरपी वेळेत मिळाली नाही. कामगारांची देणी अनेक महिने रखडवली. या सर्व कारणांमुळेच शेतकरी सभासदांची नाराजी मदन भोसलेंवर ओढावली होती. शेतकरी सभासदांचा हा रोष व नाराजी मतपेटीतून दिसून आली. या मूळ कारणांमुळेच मदनदादांचा पराभव झाला.

Back to top button