पाणी वळवा आम्हाला फरक पडत नाही : पाकिस्तानची खुमखुमी | पुढारी

पाणी वळवा आम्हाला फरक पडत नाही : पाकिस्तानची खुमखुमी

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन 

जम्‍मू काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी हल्‍ल्‍यानंतर भारतातून पाकिस्‍तानमध्ये जाणार्‍या तीन नद्‍यांचे पाणी रोखण्याचा विचार भारताकडून मांडण्यात आला. यावर पाकिस्‍तानच्या जल संसाधन मंत्रालयाचे सचिव ख्वाजा शुमैल यांनी भारताच्या या निर्णयाचा पाकिस्‍तानला काही फरक पडणार नसल्‍याचे म्‍हटले आहे.  

पाकिस्‍तानमधील डॉन या वृत्‍तपत्राला दिलेल्‍या मुलाखतीत ख्वाजा शुमैल यांनी भारताने पूर्ववाहिन्या नद्या रोखल्‍याने त्‍याचा पाकिस्‍तानवर काही परिणाम होणार नाही. कारण सिंधू जल करारानुसार ते भारताच्या अधिकारात येते. 

शुमैल यांनी या विषयी बोलताना भारत जर रावी, सतलज, बियास या नद्यांचे पाणी वळवून आपल्‍या नागरिकांसाठी वापरत असेल तर, त्‍यासाठी पाकिस्‍तानकडून कोणताही विरोध नाही. सिंधू पाणी करारानुसार रावी, सतलज, बियास या तीन नद्‍यांच्या पाण्यावर भारताचा अधिकार आहे. 

नितीन गडकरी यांनी भारतातून पाकमध्ये जाणार्‍या नद्‍यांचे पाणी थांबविण्याचे भाष्‍य केले होते.

पुलवामा हल्‍ल्‍यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमात बोलताना पाकिस्‍तानकडून दहशतवादी कारवाया थांबल्‍या नाहीत, तर सिंधू पाणी करारामध्ये येणार्‍या रावी, सतलज आणि बियास या नद्‍यांचे पाणी जे पाकिस्‍तानमध्ये जाते ते वळविण्यात येईल असे म्‍हटले होते. यामुळे जम्‍मू काश्मीर, पंजाब, हरियाणा या राज्‍यांसह इतरही राज्‍यांना या पाण्याचा फायदा होईल. ज्‍यामुळे या राज्‍यातील शेतीसाठी या पाण्याचा वापर करता येईल. या तिन्ही प्रकल्‍पांवर याआधीच काम सुरू झाले आहे. 

नितीन गडकरी यांनी या आधीही पाकिस्‍तानमध्ये जाणार्‍या पाण्यावर बांध घालून ते भारतात इतर राज्‍यात वळविण्याचा विचार मांडला होता. मात्र सध्याच्या भारत पाकमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांनी केलेल्‍या विधानाला महत्‍व प्राप्त झाले आहे. 

Back to top button