सांगली : सफाई कामगार, कर्मचारी सावकारीच्या चक्रव्युहात! | पुढारी

सांगली : सफाई कामगार, कर्मचारी सावकारीच्या चक्रव्युहात!

सांगली : उद्धव पाटील

महानगरपालिकेचे बरेच सफाई कामगार व कायम कर्मचारी सावकारी कर्जाच्या दुष्टचक्रात अडकले आहेत. सावकारांकडून त्यांची पिळवणूक होत आहे. दरमहा 10 टक्के व्याजाचा विळखा सुटता सुटेना झाला आहे. सावकारी कर्ज देताना संबंधितांचे एटीएम कार्ड सावकाराकडून काढून घेतले जाते. वाढलेले खर्च, महागाई आणि साावकारी कर्ज यामुळे आर्थिक गणित बिघडल्याने कामगार, कर्मचार्‍यांमध्ये व्यसनाधिनता वाढत आहे.

शहर पोलिस ठाण्यातील एका कर्मचार्‍याने सावकाराच्या त्रासाला कंटाळून पोलिस ठाण्यातच आत्महत्या केली. शहर पोलिस ठाण्यासमोरच असलेल्या महानगरपालिकेकडील अनेक सफाई कामगार, कर्मचारी सावकारी कर्जाने पिचले आहेत. त्याची चर्चा महानगरपालिका वर्तुळात जोरदारपणे सुरू आहे.

सफाई कामगार आणि सावकारी कर्ज हे समीकरण खूप जुने आहे. कमी पगार, कमी मानधनात काम करताना घरखर्च चालवणे अत्यंत जिकिरीचे होते. अशावेळी चटकन पैसे मिळण्याचे ठिकाण म्हणजे सावकार हेच उरते. त्याचाच फायदा घेत दरमहा दहा टक्क्यांपर्यंत व्याज आकारणी केली जाते. गरजेच्यावेळी मदत करत असल्याचा आव आणला जातो. पण, अव्वाच्या सव्वा व्याज दर आकारून आर्थिक पिळवणूक केली जाते. हे व्याजाचे दर किती भयानक आहेत, हे कर्ज घेणार्‍यालाही माहिती असते, पण आर्थिक कोंडीत सापडलेले सावज आपणहून सावकाराच्या स्वाधिन होत असते.

पूर्वी पासबुक घेत; आता एटीएम

अव्वाच्या सव्वा व्याज दरामुळे वसुलीत अडचण येते हे सावकारांना माहीत असते. त्यामुळे कर्ज देतानाच त्यांनी हमखास वसुलीची तजवीज केलेली असते. पूर्वी संबंधित कामगार, कर्मचार्‍याचे पासबुक सावकार स्वत:कडे घेत. पासबुकशिवाय पगाराची रक्कम कामगार/कर्मचार्‍याला द्यायची नाही, असे ठरलेले असे. त्यामुळे पगाराच्या दिवशी मग व्याजाची हमखास वसुली होई. आता ‘एटीएम कार्ड’चा फंडा अवलंबला जात आहे. पगाराची रक्कम संबंधिताच्या खात्यावर जमा झाली की ‘एटीएम’द्वारे वसुली केली जाते.

पगारावर बँकेतून कर्ज काढणे, कर्जदारांना जामीन होणे, कर्जदाराने परतफेड बंद केली की मग जामिनदाराच्या पगारातून कर्जाची वसुली सुरू होणे, त्यातून मग घरखर्च भागवायलाही रक्कम न उरणे असे प्रकार घडत असतात. मग अशा परिस्थितीत आजारपण, शिक्षणाचा खर्च आल्यास सावकाराकडे जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. घरखर्च, उदरनिर्वाहासाठी म्हणून कर्मचार्‍याच्या हातात पगाराच्या किमान 40 टक्के रक्कम मिळाली पाहिजे. पण, कर्जाचे हप्ते, सावकारी व्याजातच बरीच रक्कम जाते. मग घरगाडा चालविण्यासाठी आणखी कुठूनतरी कर्ज उचलण्याशिवाय पर्याय उरत नाही.

सावकारी कर्जातील व्याजाचे प्रचंड दर हेच आर्थिक पिळवणुकीचे मुख्य कारण आहे. व्याजाचेच देणे इतके होते की मूळ मुद्दलही फेडणे दुरापास्त होऊन जाते. त्यामुळे सावकारी कर्जाकडे जाऊच लागू नये, अशी व्यवस्था निर्माण होणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाने प्रभावी उपाय योजने गरजेचे आहे.

सफाई कामगारांची पतसंस्था बुडवली; आता..!

तत्कालीन सांगली नगरपालिकेच्या सफाई कामगारांची सहकारी पतसंस्था जोरात होती. मात्र, सफाई कामगार या पतसंस्थेबरोबरच अन्य सहकारी पतसंस्था, सावकारांचे कर्जही घ्यायचे. सावकार, अन्य पतसंस्थांची वसुली जोरात असायची. त्यांचे हप्ते, व्याज भरावेच लागायचे. सफाई कामगार सहकारी पतसंस्थेचे कर्ज मात्र थकीत रहायचे. थकबाकीतून सफाई कामगारांची पतसंस्था डबघाईला आली. ही पतसंस्था अखेर दिवाळखोरीत निघाली. ही पतसंस्था बंद पडून पंचवीस-तीस वर्षे झाली आहेत. त्यामुळे सफाई कामगारांना आज खासगी सावकाराच्या दारात जावे लागत आहे.

… तर सफाई, बदली, मानधनी, कंत्राटींना कर्ज देऊ

पूर्वी सफाई कामगारांची वेगळी पतसंस्था होती. ती पतसंस्था जोरात होती. त्यामुळे सांगली, मिरज, कुपवाड सिटी सॅलरी अर्नर्स को-ऑप. क्रेडिट सहकारी सोसायटीत सफाई कामगारांना सभासद करून घेता आले नव्हते. पतसंस्थेला मंजुरी मिळताना तशी अट होती. दरम्यान, महापालिकेकडील अनेक कायम कर्मचारी, सफाई कामगार, बदली कामगार, कंत्राटी कामगार सावकारी कर्जात अडकले आहेत. सहकार निबंधकांनी मान्यता दिली तर पतसंस्थेच्या उपविधीत दुरुस्ती करून सफाई कामगारांना सभासद करून त्यांना कर्जपुरवठा करता येईल. महापालिका प्रशासनाने पगारातून वसुलीची हमी दिली तर कंत्राटी, मानधनी, बदली कर्मचार्‍यांनाही एक लाख रुपयांपर्यंत कर्जपुरवठा करता येईल.
– नितीन शिंदे, अध्यक्ष (सांगली, मिरज, कुपवाड सिटी सॅलरी अर्नर्स क्रेडिट को-ऑप. क्रेडिट सोसायटी)

कर्जाची वसुली आईच्या पेन्शनमधून

महापालिकेतील एका कर्मचार्‍याने सावकारी कर्ज काढले होते. व्याज आणि कर्जाचे हप्ते फेडणे कर्मचार्‍याला अशक्य होऊ लागले. त्यामुळे सावकाराने कर्मचार्‍याच्या घराकडे मोर्चा वळवला. कर्मचार्‍याच्या आईला फॅमिली पेन्शन मिळत होती. सात हजार रुपये पेन्शनमधून पाच हजार रुपये सावकारी कर्जापोटी वसूल केले जात होते.

Back to top button