सातारा : ऊस गाळपात पुणे विभाग राज्यात दुसरा | पुढारी

सातारा : ऊस गाळपात पुणे विभाग राज्यात दुसरा

सातारा : महेंद्र खंदारे

पुणे विभागातील साखर कारखान्यांनी यंदाही मोठ्या प्रमाणात गाळप केले आहे. त्यामुळे गाळपाबरोबरच साखर उत्पादनातही मोठी वाढ झाली आहे. विभागातील 30 साखर कारखान्यांनी गळीत हंगामात तब्बल अडीच कोटी मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. यातून 2 कोटी 67 लाख 65 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. पुणे विभागाचा उतारा 10.71 टक्के पडला असून 15 एप्रिलच्या आकडेवारीनुसार केवळ एकच कारखाना बंद पडला आहे. त्यामुळे यावर्षीही पुणे विभागाने गाळप आणि उत्पादनात कोल्हापूर विभागाच्या खालोखाल बाजी मारली आहे. परंतु, गतवर्षीपेक्षा साखर उतारा कमी पडला आहे.

पश्चिम महाराष्ट्र हे साखरेचे आगार समजले जाते. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साखरेचे उत्पादन होत असते. गत दोन वर्षांत कोरोनामुळे शेतकरी व कारखानदारांना अडचणी निर्माण झाल्या. परंतु, यंदाच्या हंगामात उसाचे अमाप पीक झाल्याने कारखानदारांची चांदी झाली. कार्यक्षेत्रासह इतर भागातील जेवढा जास्त ऊस नेता येईल तितका ऊस नेण्याचा प्रयत्न कारखानदारांनी केला. तरीही अनेक ठिकाणी हजारो हेक्टरवरील ऊस अजूनही उभा आहे.

यंदा पुणे विभागात 2 लाख 12 हजार 763 हेक्टर उसाचे क्षेत्र होते. गतवर्षीच्या तुलनेत यामध्ये तब्बल 31 हजार 688 हेक्टरने वाढ झाली. त्यामुळे आपसुकच ऊस उत्पादनात वाढ झाली. पुणे विभागातील पुणे व सातारा जिल्ह्यात 17 सहकारी आणि 13 खासगी साखर कारखाने आहेत. या सर्वच कारखान्यांनी यंदाही चांगले गाळप केले. या सर्व कारखान्यांची मिळून 1 लाख 50 हजार 200 मेट्रीक टन इतकी क्षमता आहे. दिवाळीनंतर सुरू झालेला हंगाम अजूनही सुरूच आहे.

या सर्व कारखान्यांनी या गळीत हंगामा 2 कोटी 49 लाख 98 हजार टन उसाचे गाळप केले आहे. त्यातून 2 कोटी 67 लाख 65 हजार क्विंटल साखरेची निर्मिती करण्यात आली आहे. या कालावधीत फक्त एकच कारखाना बंद झालेला आहे. त्यामुळे मे अखेरीपर्यंत गाळप व उत्पादनात आणखी वाढ होणार आहे.

गाळप व उत्पादनात पुणे विभाग राज्यात दुसरा असून पहिल्या क्रमांकावर अपेक्षेप्रमाणे कोल्हापूर विभाग आहे. या विभागातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात 2 कोटी 51 लाख 76 हजार टन उसाचे गाळप होवून 2 कोटी 96 लाख 71 हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. या विभागाचा राज्यात सर्वाधिक 11.79 टक्के उतारा आहे. या विभागात एकूण 36 कारखाने असून त्यातील 29 कारखाने बंद पडले आहेत.

सव्वा टक्क्याने रिकव्हरी घसरली

कोल्हापूर पाठोपाठ पुणे विभागाची रिकव्हरी असते. मात्र, यंदा या रिकव्हरीमध्ये मोठी घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे. दरवर्षी कोल्हापूर विभागाची रिकव्हरी ही 12.50 ते 12.75 टक्के असते. तर पुणे विभागाची रिकव्हरी 12 टक्केच्या आसपास असते. परंतु, यंदा जास्त ऊस असूनही ही रिकव्हरी 10.71 टक्केच पडली आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात शेतकर्‍यांना सव्वा टक्के रिकव्हरीचा फटका सहन करावा लागणार आहे. मात्र, ही रिकव्हरी इतकी कमी का झाली? हा संशोधनाचा विषय आहे.

Back to top button