कोल्हापूरचा हॉटेल व्यावसायिक जयसिंगपुरात चोरायचा दुचाकी | पुढारी

कोल्हापूरचा हॉटेल व्यावसायिक जयसिंगपुरात चोरायचा दुचाकी

जयसिंगपूर : पुढारी वृत्तसेवा

कोल्हापूर आपटेनगर येथील वैभव रामचंद्र बोडके या हॉटेल व्यावसायिकाचे कोरोना काळात हॉटेल बंद पडले. त्यामुळे 4 लाख रुपयांचे कर्ज झाले, हे कर्ज भागविण्यासाठी दुचाकीचे लॉक काढायची पद्धत यू ट्यूबवर बघून जयसिंगपूर येथे दुचाकी चोरणार्‍या वैभवसह तिघांना जयसिंगपूर पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी दिली.

यात वैभव रामचंद्र बोडके (वय 32), रोहित विलास पोतदार (दोघे रा. आपटेनगर, कोल्हापूर) व संदीप बाळासाहेब पोतदार (वय 30, रा. शिरदवाड, ता. शिरोळ) यांना जयसिंगपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 2 लाख 30 हजार रुपयांच्या पाच दुचाकी जप्त केल्या आहेत.

जयसिंगपूर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना घडत होत्या. जयसिंगपूरचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के व पो.कॉ. रोहित डावाळे यांनी शहरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून करडी नजर ठेवली होती. एका फुटेजमध्ये दुचाकी चोरीची घटना कैद झाली होती. तर शहरात एक दिवसाआड दुचाकी चोरी होत होत्या. त्यानुसार जयसिंगपूर पोलिसांनी मंगळवारी सापळा लावला होता. वैभव पोतदार संशयितरित्या सापडल्याने जयसिंगपूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याच्यासोबत अन्य दोघेजण असून त्याने 5 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तर अन्य दोघा मित्रांना जयसिंगपूर येथून दुचाकी आणायची आहे, असे सांगून जयसिंगपूर येथे घेऊन येत होता. शहरातील सीसीटीव्हीमुळे त्याचे बिंग फुटले आहे.

Back to top button