राज्य परिवहन मंडळ : कराड आगारात 90 टक्के कर्मचारी हजर | पुढारी

राज्य परिवहन मंडळ : कराड आगारात 90 टक्के कर्मचारी हजर

कराड : पुढारी वृत्तसेवा
राज्य परिवहन मंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे यासाठी राज्यभरातील महामंडळाचे कर्मचारी गेल्या पाच महिन्यांपासून संपामध्ये होते. मुंबई उच्च न्यायालयाने 22 एप्रिलपर्यंत सर्वच कर्मचार्‍यांना कामावर रूजू होण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कराड आगारातील 90 टक्के कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागासह इतर सर्व ठिकाणी बससेवा पूर्ववत सुरू झाली आहे. यामुळे प्रवाशांमधून समाधान व्यक्‍त होत आहे.

राज्य परिवहन महामंडळातील कर्मचार्‍यांच्या संपाला चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. दि. 22 एप्रिलपर्यंत कामावर परत येण्याची डेडलाईन मुंबई उच्च न्यायालयाने दिली असल्याने गेल्या आठ दिवसांपासून कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. उर्वरित 10 टक्के कर्मचारी दि. 22 पर्यंत कामावर हजर राहतील. कराड आगाराचे एकूण 700 कर्मचारी संपावर होते. त्यातील 65 कर्मचारी कामावर यापूर्वीच हजर झाले होते. एसटी कर्मचार्‍यांचा संपामुळे दळणवळणाचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला होता. ग्रामीण भागातून शहरात व्यवसाय, नोकरीनिमित्त जाणार्‍या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले होते. त्यातही छोटे व्यावसायिकांना खासगी वाहनाने जाणे परवडणारे नसल्याने त्यांची मोठी आर्थिक अडचण निर्माण झाली होती. तर शाळा सुरू केल्या तरी ग्रामीण भागातून कराड शहरात येण्यासाठी बस नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले.

कराड डेपोमधून 24 हजार विद्यार्थी पास दिले जातात. मात्र बस नसल्यामुळे 20 हजाराहून अधिक विद्यार्थी एसटी अभावी शिक्षणापासून वंचित राहणार राहिले. मात्र आता बसेस पूर्ववत सुरू झाल्यामुळे विद्यार्थी, नोकरदार, व्यावसयिक, प्रवाशांमधून समाधान व्यक्‍त होत आहे. यात्रा, जत्रांचा मौसम असल्याने बाहेरगावी असणारे कर्मचार्‍यांनाही दिलासा मिळाला आहे. संपामुळे कर्मचार्‍यांची आर्थिक स्थिती बिकट झाली. पगार नसल्यामुळे कुटुंब चालवणे अवघड झाल्यामुळे कोणी सेंट्रिंगचे काम, कोणी रिक्षा, कोणी हमाली करत आहे. तर कोणी दुसर्‍याच्या शेतात रोजंदारीवर काम करत होते. आज ना उद्या सरकार मागण्या मान्य करेल या आशेवर कर्मचारी दिवस ढकलत होते. संप काळात कर्मचार्‍यांच्या कुटुंबाचेही हाल झाले.

कराड आगारातील एसटी सेवा आता पूर्ववत सुरू झाली आहे. 90 टक्के कर्मचारी हजर असून उर्वरित 10 टक्‍के कर्मचारीही कामावर हजर राहतील. बसेस पूर्वीप्रमाणे सर्वत्र सुरू केल्या आहेत.
– विजय मोरे
कराड आगार प्रमुख

Back to top button