‘लालपरी’ने घेतला वेग | पुढारी

‘लालपरी’ने घेतला वेग

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेली राज्याची लालपरी आता वेगाने धावू लागली आहे. बुधवारी दिवसभरात 4 हजार 888 कर्मचारी नव्याने कामावर रुजू झाले. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानंतर कामावर हजर झालेल्यांची एकूण संख्या 73 हजार 970 झाली आहे.

अद्याप 8 हजार 138 कर्मचारी संपावर आहेत. हे कर्मचारीही राहिलेल्या दोन दिवसांत कामावर येतील आणि राज्यातील एस.टी.ची वाहतूक पूर्णपणे सुरळीत होईल, असा विश्वास परिवहनमंत्री अनिल परब यांनी व्यक्त केला आहे. सध्या राज्यातील एस.टी.ची 90 टक्के वाहतूक सुरू झाली आहे.

तीन हजारांवर गाड्या नादुरुस्त एस.टी. गाड्या पाच-सहा महिने जागीच उभ्या राहिल्याने तीन हजारांपेक्षा जास्त एस.टी. गाड्या नादुरुस्त झाल्या आहेत. महामंडळाकडे एकूण 16 हजार एस.टी. गाड्या आहेत. बसचे इंजिन, बॅटरी व अन्य उपकरणे खराब झाली आहेत.

या बसेसची दुरुस्ती केल्याशिवाय त्या धावू शकत नाहीत. त्यामुळे जसजसे मनुष्यबळ उपलब्ध झाले, त्यानुसार काही एस.टी. बसेस आगारातच चालवून व त्याची देखभाल, दुरुस्ती केली जात आहे. या बसेसच्या दुरुस्तीसाठी सुमारे 140 कोटी रुपयांची आवश्यकता आहे.
22 एप्रिलपर्यंत हजर न झाल्यास नोकरी जाणार

महामंडळाने तब्बल 10 हजार कर्मचार्‍यांवर बडतर्फीची कारवाई केली आहे. त्यापैकी सुमारे दोन हजार बडतर्फ कर्मचारी अपील करून कामावर आले आहेत. तर उरलेले 8 हजार कर्मचारी आजही कामावर हजर झालेले नाहीत. ते संपात सहभागी आहेत. हे कर्मचारी जर दोन दिवसांत कामावर आले तर त्यांना नोकरीत सामावून घेण्यात येणार आहे; अन्यथा त्यांना नोकरी गमवावी लागणार आहे.

Back to top button