जितेंद्र आव्हाड : ‘जेम्स लेन २० वर्षे कुठं गेला होता ? गाडलेला राक्षस काढू नका’ | पुढारी

जितेंद्र आव्हाड : 'जेम्स लेन २० वर्षे कुठं गेला होता ? गाडलेला राक्षस काढू नका'

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याच्या राजकारणात जेम्स लेनच्या पुस्तकांवरून पुन्हा एकदा जो काही वाद सुरू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. इंडिया टुडेने जेम्स लेनला विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना लेन म्हणतो की, “छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास करताना बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडून कोणतीही माहिती घेतली नव्हती.” स्पष्टीकरणानंतर मराठा सेवा संघाचे प्रमुख पुरषोत्तम खेडेकर आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

२० वर्षे जेम्स लेन कुठं गेला होता; जितेंद्र आव्हाडांचा सवाल

जेम्स लेनच्या प्रतिक्रियेनंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, “२००३ साली हा वाद सुरू झाला होता, २० वर्षे हा कुंभकर्ण झोपला होता काय ? एवढाच त्याला पुळका होता तर पुस्तकातलं वादग्रस्त वाक्य काढ ना. हे सगळं कोण मॅनेज करत आहे, याची कल्पना नाही. पत्रकारांचं मला आश्चर्य वाटतंय की, २० वर्षांनंतर त्यांना जेम्स लेन सापडला. यावरूनच दिसतंय की, महाराष्ट्रात अस्वस्थता निर्माण करण्याचं हे उत्तम उदाहरण आहे. हा खूप मोठा कट आहे. त्या पुस्तकातून मजकूर वगळा. गाडलेला राक्षस काढू नका”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाडांनी दिली आहे.

पुरंदरे आता संपले आहेत; उगीच उकिरडे उकरत बसू नका : खेडेकर

मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर म्हणाले की, “जेम्स लेन हे प्रकरण कालबाह्य झालं आहे. त्यामुळे शरद पवारांपासून इतर जे कुणी शिवप्रेमी आहेत, त्यांनी अस्सल शिवचरित्र लिहून विविध भाषांमध्ये प्रकाशित करण्याची गरज आहे. शरद पवार जेष्ठ आहे, पण ते इतक्या उशिरा कसे काय जागे झाले? परंदरे आता संपलेले आहे, ते गेलेले आहेत. त्यामुळे उगीच उकीरडे उकरत बसण्यापेक्षा पवारांनी अस्सल शिवचरित्र प्रकाशित करण्यासाठी प्रयत्न करावे.” राज ठाकरेंवर टीका करताना खेडेकर म्हणाले की, “बरळणारी माणसं बरळत राहतात. अशा माणसांची घाणेरडी नावंदेखील मी घेत नाही.”

बाबासाहेब पुरंदरेंसदर्भात काय जेम्स लेन काय म्हणाला ?

जेम्स लेन म्हणतो की, “पुस्तकासाठी कुणीही माहिती पुरवली नाही. शिवरायांवरील पुस्तकासाठी बाबासाहेब पुरंदरे माहितीचा स्त्रोत नव्हते. त्याचबरोबर बाबासाहेब पुरंदरेंसोबत कोणतीही चर्चा केलेली नव्हती. मी जे पुस्तक लिहिले आहे, त्यामध्ये असा कोणताही उल्लेख नाही, वाचणाऱ्याच्या ते लक्षात येतं. ज्यांनी टीका केली आहे, त्यांना या पुस्तकातील कथानक समजलेलं नाही”, अशी प्रतिक्रिया जेम्स लेन यांनी इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलेलं आहे.

इंडिया टूडेला दिलेल्या मुलाखतीच्या संदर्भाने एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिलं आहे. गुडी पाढवा मेळाव्यात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा जेम्स लेन आणि बाबासाहेब पुरंदरे यांच्यासंदर्भातील वादग्रस्त मुद्दा उपस्थित केला. बाबासाहेब पुरंदरेंवर ज्यांनी टीका त्यांच्यावर राज ठाकरेंनी निशाणा साधला. परंतु, यावर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार म्हणाले की, “पहिले ते जेम्स लेन याने गलिच्छ लिहिले होते, त्याचे कौतुक पुरंदरे यांनी केलं होतं हे म्हणणं सुद्धा गलिच्छ होतं. शिवजंयतीबाबत तर त्यांनी माफी सुद्धा मागितली. मग यावर जास्त बोलून काय उपयोग नाही”, अशी प्रतिक्रिया पवारांनी केली होती.

हे वाचलंत का? 

Back to top button