निफ्टी व सेन्सेक्स : अर्थवार्ता | पुढारी

निफ्टी व सेन्सेक्स : अर्थवार्ता

* गतसप्ताहात निफ्टी व सेन्सेक्स मध्ये एकूण अनुक्रमे 113.90 अंक व 1170.49 अंकांची वाढ होऊन दोन्ही निर्देशांक 17784.35 अंक तसेच 59447.18 अंकांच्या पातळीवर बंद झाले. निफ्टीमध्ये 0.64 टक्के तर सेन्सेक्समध्ये 0.29 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. गतसप्ताहात रिझर्व्ह बँकेची द्वैमासिक पतधोरण आढवा बैठक होती. त्यामध्ये वाढत्या महागाईवर लक्ष्य केंद्रित करण्याचे सूतोवाच करण्या आले, तसेच देशातील महत्त्वाची एचडीएफसी बँक व एचडीएफसी लिमिटेड यांच्या विलीनीकरणाची बातमी आली. यामुळे बाजारात मोठी चढउतार अनुभवायला मिळाली. निफ्टीने पुन्हा एकदा 18114 अंकांचा तसेच सेन्सेक्सने 60845 अंकांचा टप्पा गाठला.

* रिझर्व्ह बँकेची पतधोरण आढावा बैठक संपन्न रेपोरेट 4 टक्क्यांवर तर रिव्हर्स रेपो रेट 3.35 टक्क्यांवर कायम. चालू आर्थिक वर्षासाठी अर्थव्यवस्था वृद्धीदर अंदाज 7.8 टक्क्यांवरून 7.2 टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात आला तसेच देशातील महागाईदराचा अंदाज 4.5 टक्क्यांवरून 5.7 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यापूर्वी पतधोरण ठरवताना अर्थव्यवस्थावृद्धीस अधिक महत्त्व देण्याचे धोरण (डीेंपलश) होते.

परंतु यापुढे काही काळ वृद्धी दरास गौण स्थान देऊन महागाई नियंत्रणास अधिक महत्त्व देण्याचे धोरण आखण्यात आले आहे. यापूर्वी 22 मे 2020 म्हणजे सुमारे दोन वर्षांपूर्वी रेपोरेट दरात अखेरचा बदल आला होता. रिझर्व्ह बँकेच्या या धोरणामुळे नजीकच्या कालावधीत कर्जे महाग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 10 वर्षे कालावधीच्या रोख्यांचा व्याजदर जून 2019 नंतर प्रथमच 7 टक्क्यांच्या वर गेला. सप्ताहाअखेर शुक्रवारी 10 वर्षे कालवधीच्या सरकारी रोख्यांचा व्याजदर 7.1190 टक्क्यांवर बंद झाला. रुपया चलन डॉलरच्या तुलनेत 5 पैसे मजूबत होऊन 75.91 रुपये प्रती डॉलर स्तरावर बंद झाले.

* देशातील सर्वाधिक मोठ्या गृहकर्ज वितरण तसेच बँकिंग क्षेत्रातील कंपन्या एचडीएफसी बँक तसेच एचडीएफसी लिमिटेड यांचे विलीनीकरण होणार. एकत्रीकरण पश्चात एचडीएफसी बँक आजच्या बाजारभावानुसार रिलायन्सनंतर देशातील सर्वांत मोठी सुमारे 14 लाख कोटींचे भांडवल बाजारमूल्य असलेली दुसर्‍या क्रमांकाची कंपनी बनेल. आपली प्रतिस्पर्धा खासगी आयसीआयसीआय बँकेपेक्षा एचडीएफसी बँकेचा आकार सुमारे दुपटीने मोठा असेल.

एचडीएफसी लिमिटेडच्या समभागधारकांचा एचडीएफसी बँकेमध्ये सुमारे 41 टक्के हिस्सा असेल तसेच एका एचडीएफसी लिमिटेड समभागाच्या बदल्यात एचडीएफसी बँकेचे 1.68 समभाग याप्रमाणात समभागांचे वाटप होईल. परंतु विलीनीकरणपश्चात एचडीएफसी बँकेची एचडीएफसी लाईफमध्ये 48 टक्के, तर एचडीएफसी अर्गोमध्ये 50 टक्के हिस्सेदारी होईल. या दोन्ही कंपन्यादेखील एचडीएफसी बँकेच्या विमा (इन्श्युरन्स) क्षेत्रातील कार्यरत कंपन्या असल्याने रिझर्व्ह बँकेच्या सध्याच्या नियमानुसार विलीनीकरणातील अडसर ठरू शकतो. परंतु यासंबंधी लवकरच तोडगा निघण्याची आशा गुंतवणूकदारांना आहे.

* आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये थेट कर संकलनात भरघोस 49 टक्क्यांची, तर अप्रत्यक्ष करसंकलनात (खपवळीशलीं ढरुशी) 20 टक्क्यांची वाढ प्रत्यक्ष करसंकलन 9.45 लाख कोटींवरून 14.1 लाख कोटींवर, तर अप्रत्यक्ष कर संकलन 10.77 लाख कोटींवरून 12.9 लाख कोटींवर पोहोचले. आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये एकूण 27.07 लाख कोटींचे विक्रमी संकलन झाले.

* अबू-धाबी इंटरनॅशनल होल्डिंग कंपनी अदानी उद्योग समूहामध्ये 2 अब्ज डॉलर्स गुंतवणार. अदानी एंटरप्राईजेस कंपनी यासाठी 7700 कोटींचे, तर अदानी ग्रीन व अदानी ट्रान्समिशन 3850 कोटींचे प्राधान्य समभाग (झीशषशीशपींळरश्र डहरीशी) जारी करणार सरकारतर्फे सर्व परवानग्या मिळाल्यावर व्यवहार पूर्ण होण्यास 1 महिना कालावधी लागणार.

* मार्च महिन्यात म्युच्युअल फंडामध्ये इक्विटी प्रकारात येणार्‍या गुंतवणुकीमध्ये भरघोस 43 टक्क्यांची वाढ. मार्च महिन्यात इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये 28463.49 कोटींची गुंतवणूक मासिक तत्त्वावरील एसआयपीमध्येदेखील विक्रमी 12327.9 कोटींची गुंतवणूक करण्यात आली.

* एप्रिलमध्ये (मार्चमध्ये केल्या गेलेल्या व्यवहारानुसार) जीएसटी संकलनाने नवा विक्रम प्रस्थापित केला. एप्रिलमध्ये जीएसटी संकलनाने दीड लाख कोटींचा टप्पा पार केला.

* टाटा उद्योग समूहातर्फे ‘टाटा न्यू’ हे अनोखे अ‍ॅप विकसित करण्यात आले. टाटा समूहामध्ये जेवढ्या कंपन्यांच्या सेवा आणि वस्तू उपलब्ध आहेत. त्या सर्वांचा लाभ ग्राहकांना या एकाच अ‍ॅपमार्फत घेता येणार आहे. टाटा समूहामध्ये बिगबास्केट, क्रोमा, इंडियन हॉटेल्स, टाटा 1 एमजी, टाटा प्ले, वेस्टसाईड, स्टारबक्स, टाटा क्लिक यासारख्या महत्त्वाच्या कंपन्या आहे. या सर्व कंपन्यांच्या वस्तू व सेवा ग्राहकांसाठी एकाच अ‍ॅपवर यापुढे उपलब्ध होणार.

* बंधन फायनान्शिअल होल्डिंग कंपनी काही इतर गुंतवणूकदारांसह मिळून आयडीएफसी अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी (म्युच्युअल फंड) 4500 कोटींना विकत घेणार. यामध्ये बंधन फायनान्शिअल होल्डिंगचा 60 टक्के, तर जीआयसी आणि क्रिस कॅपिटल यांचा प्रत्येकी 20 टक्के हिस्सा असेल.

* ‘इन्व्हेस्को’ या गुंतवणूकदार उद्योग समूहाने ‘झी एंटरटेन्मेंट एंटरप्राईझ’ मधील 7.74 टक्के हिस्सा 2092 कोटींना विकला. इन्व्हेस्कोने ‘झी’चे 74.32 दशलक्ष समभाग 281.46 रु. किमतीला विकले.

* रशियावर आर्थिक निर्बंध टाकल्यानंतर रशियाला निर्यात करणार्‍या भारतीय निर्यातदारांचे अडकलेले पैसे मिळाले. 36 पैकी 35 बड्या निर्यातदारांचे पैसे युरोपमधील बँकांच्या मार्गाने मिळाले. आर्थिक निर्बंधांमुळे निर्यातदारांचे सुमारे 400 ते 600 दशलक्ष डॉलर्स अडकले होते.

* आर्थिक वर्ष 2022 मध्ये महामार्गांच्या टोल संकलनामध्ये सुमारे 67 टक्क्यांची वाढ होऊन संकलन 38 हजार कोटींवर पोहोचले.

* 1 एप्रिल रोजी संपलेल्या सप्ताहात भारताची परकीय गंगाजळी तब्बल 11.173 अब्ज डॉलर्सनी घटून 606.475 अब्ज डॉलर्सपर्यंत खाली आली. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रुपया चलनाला डॉलरच्या तुलनेत स्थिर ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात राखीव गंगाजळीचा वापर करण्यात आला.

Back to top button