Satara : सेवा रस्त्यांवर चोरट्यांचे ‘टोलनाके’ | पुढारी

Satara : सेवा रस्त्यांवर चोरट्यांचे ‘टोलनाके’

खेड; अजय कदम : राष्ट्रीय महामार्ग आता वाहनचालकांसाठी असुरक्षित आणि चोरट्यांसाठी सुरक्षित बनला आहे. वाढे फाटा ते शिवराज पेट्रोल पंप या सेवा रस्त्यावर चोरट्यांचे टोलनाके उभे राहिले की काय? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच दररोज कुठे ना कुठे मारामारी, चोरी, खून, लूटमारीचे सत्र सुरूच आहे. रात्रीच्यावेळी लूटमार सुरू असल्याने वाहनचालक व प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

सातारा शहराच्या हद्दीबाहेरून जाणारा राष्ट्रीय महामार्ग गुन्हेगारांचा अड्डा बनू लागला आहे. या महामार्गावर दररोज लूटमारीच्या घटना घडू लागल्या आहेत. वाढेफाटा, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, अजंठा चौक, शिवराज पंप या परिसरात रात्री-अपरात्री प्रवाशाला हेरून काळोखात लुटले जात आहे.

पुणे – मुंबईकडून आलेली वाहने या चौकात थांबतात. अनोळखी, परगावाहून आलेल्या प्रवाशाला नंबरप्लेट नसलेल्या दुचाकी, चारचाकी व्हॅनच्या माध्यमातून आडवे येवून लूटमार होत असल्याच्या तक्रारी आहेत. तर, बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील उड्डानपुलानजीक सेवा रस्त्यालगत विश्रांतीसाठी थांबलेल्या परराज्यातील ट्रक चालकांना टार्गेट केले जात आहे.त्यांना अडवून मारहाण केल्याच्या घटनाही वारंवार होत आहेत. अनेक जण पोलिस ठाण्याची पायरी चढत नसल्याने लूटमारीच्या घटना समोर येत नाहीत.

वाढे फाटा ते शिवराज पेट्रोल पंप या सेवा रस्त्यांवर पथदिवे नसल्याने व दिशादर्शक फलकांचा अभाव असल्याने वाहनचालकांची फसगत होत आहे. ही परिस्थिती चोरट्यांना पोषक ठरत आहे. वाढेफाटा, बॉम्बे रेस्टॉरंट, अजंठा चौक, शिवराज पंप येथे रात्रीच्या वेळी वाहनातून उतरलेला प्रवासी सेवा रस्त्याने चालत निघाल्यास लुटारू डाव साधत आहेत. यामधील अनेक प्रकरणे पुढे न आल्याने चोरट्यांचे फावत आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे महामार्ग दिवसेंदिवस असुरक्षित बनत चालला आहे. वाढेफाटा ते अजंठा चौकाच्या सेवा रस्त्यालगत रात्रीच्या वेळी सुरू असलेले चहा स्टॉल चोरट्यांच्या पथ्यावर पडत आहेत. महामार्ग प्राधिकरणाने सेवा रस्त्यांवर पथदिवे बसवले नसल्याने चोरट्यांचे चांगलेच फावत आहे.

पोलिसांनी अ‍ॅक्शन मोडमध्ये यावे

बॉम्बे रेस्टॉरंट चौकात बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे शोपिस बनले आहेत. महामार्ग सेवा रस्त्यावरील लूटमार रोखण्यासाठी पोलिसांनी अ‍ॅक्शन मोडमध्ये येणे गरजेचे आहे.

Back to top button