नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या उपनिरीक्षकासह तिघांना अटक | पुढारी

नागपूर : रेल्वे सुरक्षा दलाच्या उपनिरीक्षकासह तिघांना अटक

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : तरुण मुले व मुलींच्या माध्यमातून कॅटरिंगच्या बहाण्याने ओडिशातून गांजाची तस्करी रेल्वे सुरक्षा दलातील अधिकारी करत होते. याप्रकरणी नागपूर गुन्हेशाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने रेल्वे सुरक्षा दलाच्या उपनिरीक्षकासह तिघांना अटक करण्यात आली आहे. यात पोलिसांच्या मुलाचाही समावेश आहे. या कारवाईमुळे रेल्वे सुरक्षा दलात खळबळ उडाली असून, या दलातील आणखीही काही अधिकारी व कर्मचारी गुन्हेशाखेच्या रडारवर असल्याची माहिती समोर येत आहे.

सुत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, रामसिंग चोथमल मीना (वय ३०, रा. शांतीनगर), लवलेश ऊर्फ भुऱ्या ऊर्फ कुश चंद्रमोहन माळी (वय २३, रा. जागनाथ बुधवारी), विजय ऊर्फ बंटी गुप्ता (वय ३०, रा. मेहदीबाग) अशी तस्करी करणा-यांची नावे आहेत. मीना उपनिरीक्षक असून, लवलेश पोलिस हेडकॉन्स्टेबलचा मुलगा आहे. सोमवारी पोलिसांनी या प्रकरणात अटकेतील सूत्रधार अभिषेक ललित पांडे (वय १९, रा. भीमनगर, एमआयडीसी) व अरुण ऊर्फ सोनू राजकुमार ठाकूर (वय २८, रा. फेटरी) या दोघांना अटक केली होती.

तसेच, अभिषेक हा ओडिशातून नागपुरात गांजा आणतो. यासाठी तरुणींची मदत घेतो. २५ मार्चला अभिषेक व दत्तू विशाल ऊर्फ दत्तू खाटिक या दोघांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी सखोल चौकशीनंतर गुन्हेशाखेला याबाबत माहिती देण्यात आली. गुन्हेशाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थविरोधी पथकाचे निरीक्षक मनोज सिडाम व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपास केला. सोमवारी अभिषेक व अरुणला अटक केली. दोघांची चौकशी केली असता उपनिरीक्षक मीना व अन्य दोघांची नावे समोर आली. तसेच पथकाने मंगळवारी मीना यांच्या घरी छापा टाकला. त्याच्या घरून सहा किलो गांजा जप्त केला. तसेच अन्य दोघांनाही अटक केली. याप्रकरणात आणखी दोघे फरार आहेत, अशी पोलिसांनी माहिती दिली.

 

Back to top button