Kim Yo Jong : ‘किम जोंग उन’च्या बहिणीची ‘सटकली’, ‘या’ देशावर अणुबॉम्ब टाकण्याची दिली धमकी | पुढारी

Kim Yo Jong : ‘किम जोंग उन’च्या बहिणीची ‘सटकली’, ‘या’ देशावर अणुबॉम्ब टाकण्याची दिली धमकी

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांची बहीण किम यो जोंग (Kim Yo Jong) यांनी दक्षिण कोरियाला अणुबॉम्बने नष्ट करण्याची धमकी दिली आहे. तीन दिवसांत त्यांची ही दुसरी धमकी आहे. जर द. कोरियाने लष्करी मुकाबला केला तर आमचे आण्विक लढाऊ दल आपले चोख काम बजावेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

हुकूमशहा किम जोंग उन यांच्या बहिणीने दक्षिण कोरियाचे संरक्षण प्रमुख सुह वूक यांची खिल्ली उडवत उत्तर कोरियाविरुद्ध हल्ल्याबद्दल बोलणे त्यांची (द. कोरिया) मोठी चूक असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या सैन्याला आम्ही आमच्या दर्जाचे मानत नाही, असेही किम यो जोंग (Kim Yo Jong) यांनी म्हटले आहे.

गेल्या आठवड्यात दक्षिण कोरियाचे संरक्षण प्रमुख सुह वूक यांनी थेट उत्तर कोरियाला चेतावणी दिली होती. आमच्याकडे उत्तर कोरियाच्या कोणत्याही शहरावर अचूक मारा करू शकणारी क्षेपणास्त्रे आहेत. तसेच द. कोरियाच्या लष्कराकडे अशी क्षेपणास्त्रे आहेत जी उ. कोरियाच्या कोणत्याही लक्ष्यावर जलद आणि अचूक मारा करू शकतात. जेव्हा जेव्हा उत्तर कोरियाचे क्षेपणास्त्र येताना दिसेल, तेव्हा आम्ही प्रतिहल्ला करण्यास पूर्णपणे सक्षम आहोत, असा सुह यांनी इशारा दिला होता. मात्र, या नंतर उ. कोरिया चवताळला आणि हुकूमशहा किम जोंग उन यांच्या बहिणीने (Kim Yo Jong) प्रत्युत्तर दिले.

जोंग यांनी मंगळवारी उत्तर कोरियाच्या सरकारी मीडिया केसीएनएला सांगितले की, द. कोरियाचा ‘मुर्ख माणूस’ सुहने उ. कोरियावर हल्ला करण्याचा इशारा देणे ही त्यांची मोठी चूक आहे. जर त्यांनी असे काही पाऊल उचलण्याचा प्रयत्न जरी केला तरी द. कोरियाला अणुबॉम्बने उद्ध्वस्त करण्यासाठी उ. कोरिया मागेपुढे पाहणार नाही.

शत्रूचे सैन्य एका फटक्यात नष्ट होईल…

सुह यांच्या इशाऱ्याला उत्तर देताना किम यो जोंग यांनी असेही सांगितले की, उत्तर कोरियाच्या अणुशक्तीचा मुख्य उद्देश अण्वस्त्र प्रतिबंधक क्षमता राखणे हा आहे, परंतु जर सशस्त्र संघर्ष झाला तर आम्ही शत्रू देशाच्या सैन्याला एका झटक्यात नष्ट करू. या प्राणघातक हल्ल्यात द. कोरियाचे सैन्य नष्ट होईल आणि संपूर्ण विनाश होईल. द. कोरियाला ही आपत्ती टाळायची असेल, त्यांनी मुर्खासारखा विचार करू नये, असा सल्लाही किम यो जोंग यांनी दिला आहे.

उत्तर कोरियाने गेल्या महिन्यात तब्बल पाच वर्षांनंतर आंतरखंडीय क्षेपणास्त्रांची चाचणी सुरू केली. यामुळे या प्रदेशात पुन्हा शस्त्रास्त्रांची शर्यत आणि संघर्षाचा धोका वाढला आहे. हुकूमशाह किम जोंग उन आणि अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात झालेल्या चर्चेनंतर उ. कोरियाने लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे आणि आण्विक चाचण्या थांबवल्या. मात्र, २०१९ नंतर चर्चा बंद आहे.

उ. कोरिया या महिन्यात त्यांच्या देशाचे संस्थापक दिवंगत किम इल सुंग यांची ११० वी जयंती साजरी करणार आहे. सुंग हे सध्याचे शासक किम जोंग उन यांचे आजोबा होते. या निमित्ताने उत्तर कोरिया लष्करी परेड, शस्त्रास्त्रांची चाचणी आणि उपग्रह प्रक्षेपण करत आहे.

Back to top button