कानातून पाणी वाहतेय? | पुढारी

कानातून पाणी वाहतेय?

अनेक लोक कानातून पाणी येत असल्याची तक्रार करतात. काहीवेळा त्याकडे दुर्लक्ष करतात, तर काहीवेळा ही गंभीर समस्यादेखील होऊ शकते. कानातील पडदा फाटल्याने पाणी येण्याची आणि बहिरेपणा येण्याची शक्यता असते. कानाच्या बाहेर किंवा आतमध्ये पाणी जमा होणे किंवा वाहणे यास कान फुटणे असेही म्हणतात.

कान का फुटतो?

आपला कान एका ट्यूबच्या माध्यमातून नाकाचा मागील भाग आणि गळ्याच्या वरच्या भागाला जोडलेला असतो. अनेकदा नाक आणि घशात होणार्‍या त्रासामुळे कानावर परिणाम हातो. त्यामुळे कानात सूज येऊ शकते आणि ट्यूब बंद होते. कानातील मधल्या भागात पातळ पदार्थ जमा होऊ लागतो आणि दाब वाढल्यानंतर हा पातळ पदार्थ बाहेर येऊ लागतो. परिणामी, कानाच्या नाजूक पडद्याची हानी होऊ शकते.

कान फुटण्याची लक्षणे

कानातून पांढरा, पिवळा किंवा रक्तयुक्त पदार्थ बाहेर येणे, कान दुखणे, कान फुटण्याबरोबरच ताप येणे किंवा डोके दुखणे, ऐकण्याची क्षमता कमी होणे, एअर कॅनालमध्ये सूज आणि कान लालसर होणे, चेहरा ताणणे.

कारणे काय?

कोणत्याही प्रकारचा संसर्ग, बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शन, कानाला मार लागणे, जखम होणे, हवेतील प्रदूषण, घशात संसर्ग, ताप येणे, दातांत संसर्ग, कानात दीर्घकाळ इअरफोन लावणे, कान खाजवणे किंवा कानात पीन, काडी घालणे, सायनस, धूम्रपान, नेहमीच कानावर झोपणे आदी कारणांमुळे कान फुटण्याची शक्यता असते.

काय काळजी घ्यावी?

कानात कोणतीही वस्तू घालू नये किंवा खाजवू नये, रस्त्यावर कान साफ करणार्‍या लोकांकडून कान स्वच्छ करून घेऊ नये, कानात गरम तेल टाकू नये. पोहताना ईअर प्लग्स घालणे गरजेच आहे. संसर्ग असेल, तर कानात कापूस घालावा किंवा ईअर प्लग्सचा वापर करावा. सतत फंगल इन्फेक्शन होत असेल, तर मधुमेहाची तपासणी करावी.
डॉ. संजय गायकवाड

Back to top button