कसे ओळखाल सदोष बियाणे? जाणून घ्या अधिक | पुढारी

कसे ओळखाल सदोष बियाणे? जाणून घ्या अधिक

ज्या वेळेस आपण प्रमाणित बियाणे खरेदी करतो त्या बियाण्याच्या पिशवीवर किंवा टॅगवर प्रमाणित केलेल्या प्रमाणकापेक्षा किंवा दिलेल्या माहितीबरोबर जर बियाण्यांची गुणवत्ता नसेल तर त्यास सदोष बियाणे म्हणतात.

सदोष बियाणे : यामध्ये प्रामुख्याने पुढील परिस्थितीतील बियाणे सदोष म्हणता येईल. उगवण क्षमता पोषक परिस्थितीत पेरल्यानंतर खूपच कमी असेल तर बियाणे सदोष आहे, असे समजावे. तसेच बियाण्याची भौतिक शुद्धता म्हणजे त्यातील काडीकचरा, इतर पिकांचे बियाणे, तणाचे बी यांचे प्रमाण टॅगवरील माहितीपेक्षा जास्त असल्यास हे बियाणे सदोष आहे असे समजावे. तसेच या बियाण्यांची आनुवंशिक शुद्धता नसल्यास म्हणजे त्या बियाण्यांचा एकसारखेपणा, झाडांचे बाह्य गुणधर्म यामध्ये एकसारखेपणा नसल्यास तसेच झाडांची कणसे, शेंगा, ओंब्या यामध्ये विविधता आढळल्यास हे बियाणे सदोष आहे असे समजावे.

बियाणे साधारणत: पाच आणि सात दिवसांत उगवते. यामध्ये शेतकर्‍याने प्रत्येक पीक अवस्थेचे निरीक्षण करणे आवश्यक आहे. त्या अगोदर खरेदी केलेले बियाणे थोडेसे तपासणीसाठी शिल्लक ठेवूनच वापरावे. बियांची उगवण क्षमता कमी आहे असे आढळल्यास तत्काळ खरेदी केलेल्या बियाण्याचा नमुना बियाणे निरीक्षक, पंचायत समिती यांना तपासणी करणेबाबत सक्षम सांगावे. बियाण्यामध्ये अनुवंशिक किंवा भौतिक शुद्धतेत दोष आढळल्यास प्रथम पंचायत समितीच्या किंवा जिल्हा परिषद कृषी अधिकार्‍यांकडे तक्रार अर्ज देऊन त्यांच्याकडून पाहणी करून घ्यावी. तक्रार अर्ज सादर करताना बियाणे खरेदी बिलाची सत्य प्रत जोडावी.
– अनिल विद्याधर

Back to top button