कंगना, अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात मी हक्कभंग आणला म्हणून माझ्यावर कारवाई : प्रताप सरनाईक | पुढारी

कंगना, अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात मी हक्कभंग आणला म्हणून माझ्यावर कारवाई : प्रताप सरनाईक

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री कंगना रनौत आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात विधानसभेत मी हक्कभंग प्रस्ताव आणला होता. या सूडभावनेतून माझ्यावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईविरोधात न्यायालयात जाणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी आज (शुक्रवार) विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना दिली.

आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांची ११.३६ कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्याचबरोबर ठाण्यातील दोन फ्लॅट्सवर जप्ती आणण्यात आली आहे. एनएसईएल घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई आज केली. या कारवाईवर प्रतिक्रिया देताना आमदार सरनाईक म्हणाले की, नगरसेवक, आमदार म्हणून संपत्ती जप्त केलेली नाही. तर एक राजकीय नेता म्हणून अशा कारवाईला सामोरे जावे लागत आहे. गेल्या आठवड्यात मला जप्तीची कारवाई करण्याबाबत ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली होती.

या कारवाईत ठाणे, मीरा रोड येथील जमीन जप्त करण्यात आली आहे. तसेच हिरानंदानी येथील घरावर जप्ती आणण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या संघर्षात मला कारवाईला सामोरे जावे लागत असल्याची खंत सरनाईक यांनी यावेळी बोलून दाखवली. माझ्या अडचणीच्या काळात कुटुंब प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. या कारवाईविरोधात न्यायालयात जाणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले.

ईडीच्या माध्यमातून सुरु असलेल्या चौकशीला मी आणि माझे  कुटुंब संपूर्णपणे सहकार्य करीत आहे. परंतु या सर्वात माझी आणि माझ्या  कुटुंबाची फरफट झाली आहे. मी जी भूमिका मांडली त्यामुळे कोणाच्या तरी सांगण्यावरून चौकशी लावली असली तरी यात माझ्या कुटुंबाचा यात काय दोष होता. त्यामुळे हा सर्व प्रकार वेदनादायी आहे. तसेच माझ्यावर जे काही आरोप करण्यात आलेले आहेत, त्या विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे आमदार सरनाईक यांनी म्हटले आहे.

हेही वाचलंत का ? 

पहा व्हिडिओ : कशी घेऊयात कानाची काळजी | how to Care for your Ears Properly

Back to top button