पुणे : फोन टॅपिंग प्रकरणी तत्कालीन पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांची दिवसभर चौकशी | पुढारी

पुणे : फोन टॅपिंग प्रकरणी तत्कालीन पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांची दिवसभर चौकशी

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : फोन टॅपिंग प्रकरणात गुन्हे शाखेच्या तत्कालीन पोलिस उपायुक्त पंकज डहाणे यांची पुणे पोलिसांनी सोमवारी दिवसभर चौकशी केली. आत्तापर्यंत सहा ते सात जणांची पोलिसांनी संबंधीत प्रकरणात चौकशी केली असून, त्यामध्ये पोलिस उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांपासून ते तांत्रिक विश्लेषण विभागात काम करणार्‍या काही कर्मचार्‍यांचा समावेश आहे.

नुकतेच या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी सहायक पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकार्‍याच्या नेतृत्वाखाली पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. शुक्ला यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिलेल्या तोंडी आदेशाद्वारे हे फोन टॅपिंग करण्यात आले असल्याचे सुत्रांनी सांगितले. त्यामुळे अनेकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

तांत्रिक विश्लेषण हा विभाग गुन्हे शाखेच्या पोलिस उपायुक्तांच्या निंत्रणाखाली येतो. चौकशी करण्यात आलेले पोलिस अधिकारी डहाणे शुक्ला यांच्या कार्यकाळात गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत होते. त्या कालावधीत हा सर्व फोन टॅपिंगचा प्रकार झाल्यामुळे त्यांची देखील सोमवारी पोलिसांनी चौकशी केली. तसेच यापुर्वी तांत्रिक विश्लेशण विभागाचे तत्कालीन पोलिस निरीक्षक व तेथे काम करणारे कर्मचारी यांची चौकशी करण्यात आली असून, त्यांचे जबाब नोंदविण्यात आले असल्याचे समजते. त्यांनी हे फोन टॅपिंग कोणाच्या सांगण्यावरून केले. त्यांना कोणाचे आदेश होते. कशाप्रकारे फोन टॅप केले. याबाबतची माहिती तपास अधिकारी घेत आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार आशिष देशमुख आणि मंत्री बच्चू कडू यांचे वेगवेगळ्या नावाने साठ दिवस फोन टॅपिंग केल्याच्या आरोपावरून शुक्ला यांच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. राज्य सरकारने नेमलेल्या चौकशी समितीने दिलेल्या अहवालावरून पुणे पोलिसांनी फोन टॅपिंगमध्ये गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर मुंबईतदेखील गुन्हे दाखल झाले आहेत. पुण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात पुणे पोलिसांकडून तपास केला जात आहे.

या प्रकरणात फोन टॅपिंग झालेल्या राजकीय व्यक्तींकडून देखील माहिती घेतली जात आहे. रेकॉर्डिंगमधील आवाज त्यांचाच आहे का हे पडताळून पाहिले जाते आहे. फोन टॅपिंग प्रकरणात संबंधित असलेल्या व्यक्तींचे जबाब नोंदविण्यासाठी पुणे पोलिसांनी तयारी केली आहे. एका वरिष्ठ अधिकार्‍याच्या देखरेखीखाली हे जबाब नोंदविले जाणार आहेत. तर काही जणांचे जबाब देखील नोंदविण्यात आले आहेत.

Back to top button