आसाम आणि मिझोराम का भिडले? | पुढारी

आसाम आणि मिझोराम का भिडले?

दोन राज्यांमध्ये रक्‍तरंजित संघर्ष निर्माण होण्याचा प्रसंग देशात प्रथमच घडला. आसाम आणि मिझोराम या दोन राज्यांचे पोलीस एकमेकांना भिडले. आसामच्या बराक खोर्‍यातील कछर, करीमगंज आणि हैलकांडी यांची मिझोरामच्या आयझॉल, कोलासिब आणि मामित या तीन जिल्ह्यांना लागून 164 कि.मी. ची सीमा आहे. यावरून दोन्ही राज्यांमध्ये वाद आहे.

आसाम पोलिसांनी मिझोराममधील कोलासिब येथील पोलीस चौकीचा ताबा घेतल्यानंतर हिंसाचाराला तोंड फुटले. यावेळी झालेल्या गोळीबारात आसामच्या 5 पोलिसांसह 6 जण मृत्युमुखी पडले, तर 50 जण जखमी झाले आहेत.

यामध्ये मूळचे महाराष्ट्राचे असलेले आयपीएस अधिकारी वैभव निंबाळकर जखमी झाले आहेत. या दोन्ही राज्यांमधील सीमेवरून असलेला वाद नवा नाही. त्याला 100 वर्षांचा इतिहास आहे.

मिझोरामच्या म्हणण्यानुसार सोमवारी आसामच्या कछार जिल्ह्यातून एक दाम्पत्य मिझोराममध्ये आले होते. ते परतताना त्यांच्या गाडीवर दगडफेक झाली. तेथून वाद निर्माण झाला आणि प्रकरण गोळीबारापर्यंत गेले. गेल्या वर्षीही या ठिकाणी संघर्ष उफाळून आला होता.

मिझोरामच्या दोघांना 9 ऑक्टोबर रोजी पेटवण्यात आले होते. त्याचवेळी काही झोपड्या आणि सुपारीची झाडेही जाळण्यात आली.

त्यानंतर कछार लोकांनी मिझोराम पोलीस आणि तेथील स्थानिक लोकांवर दगडफेक केली होती. त्यानंतर लाठ्या-काठ्यांचाही वापर करण्यात आला. पोलिसांकडून अश्रुधूर सोडण्यात आला. याचवेळी दोन्ही बाजूंच्या पोलिसांकडून गोळीबार करण्यात आला.

1950 मध्ये आसाम राज्याची स्थापना झाली. त्यावेळी आसाममध्ये नागालँड, अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि मिझोराम यांचा समावेश होता. ही राज्ये अलग झाल्यानंतर आसाम आणि त्यांच्या सीमेवरून वाद निर्माण झाला होता.

1987 मध्ये मिझोरामला स्वतंत्र राज्य म्हणून मान्यता मिळाली. मिझो आदिवासी आणि केंद्र सरकारमध्ये झालेल्या करारानुसार हे राज्य तयार करण्यात आले. त्यावेळी 1933 मध्ये झालेल्या कराराचा आधार घेण्यात आला होता.

मात्र, मिझो आदिवासींच्या म्हणण्यानुसार 1875 च्या करारानुसार आम्ही सीमा निश्‍चित केलेल्या आहेत. यानंतर दोन्ही राज्यांमध्ये सातत्याने संघर्ष चिघळत गेला. आसामच्या सीमेवर बंगाली लोकांचे वास्तव्य आहे. त्यात मुस्लिम नागरिकांचा अधिक समावेश आहे.

मिझोरामचे नागरिक या लोकांकडे संशयाच्या दृष्टीने पाहतात. या बंगाली लोकांकडे कागदपत्रे नाहीत. ते विस्थापित आहेत. मिझोराममध्ये येऊन ते आमच्या जमिनीवर कब्जा करू शकतात, असा मिझोरामच्या लोकांचा आरोप आहे.

आसाम सरकारच्या म्हणण्यानुसार मिझोरामच्या लोकांनी बराक घाटीमध्ये आसामच्या तीन जिल्ह्यांतील 1777.58 हेक्टर जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केला आहे.

यात हैलकांडी जिल्ह्यातील सर्वाधिक 1000 हेक्टर जमिनीचा समावेश आहे, तर मिझोरामच्या दाव्यानुसार आसामने आपल्या जमिनीवर हक्‍क सांगितला आहे. या जागेवर गेल्या 100 वर्षांपासून मिझो आदिवासी राहात आहेत.

वाद मिटवण्याचे प्रयत्न

सीमावर्ती भागात कोणतीही मानवी वस्ती असणार नाही, असा करार आसाम आणि मिझोराम मध्ये झाला होता. मात्र, त्यामुळे हा वाद थांबला नाही. तो सोडवण्याचा प्रयत्न गेल्यावर्षी केेंद्र सरकारने केला.

मात्र, त्यावेळी मिझोरामला जाणार्‍या राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे मिझोराममध्ये अत्यावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली होती.

Back to top button