भय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरण : शिष्या पलकला ६ वर्षे कारावास | पुढारी

भय्यूजी महाराज आत्महत्या प्रकरण : शिष्या पलकला ६ वर्षे कारावास

इंदूर : वृत्तसंस्था 

मध्य प्रदेशातील बहुचर्चित भय्यूजी महाराज आत्महत्या खटल्यात 3 वर्षांनी न्यायालयाने निकाल दिला आहे. इंदूर जिल्हा न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र सोनी यांनी भय्यूजी महाराज यांची शिष्या पलक, मुख्य सेवक विनायक, चालक शरद यांना प्रत्येकी 6-6 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

तिघे गेल्या 1105 दिवसांपासून कारागृहातच आहेत. या अर्थाने निम्मी शिक्षा या सर्वांनी भोगली आहे. आता त्यांना फक्त 3 वर्षे कारागृहात काढावी लागतील. सेवादार विनायक याच्या जामिनासाठी त्याच्या वकिलांनी (धर्मेंद्र सिंह गुर्जर) सर्वोच्च न्यायालयाचेही दार ठोठावले होते. मात्र त्याचा उपयोग झाला नव्हता. या खटल्यात 32 साक्षीदार सरकार पक्षाकडून सादर करण्यात आले. भय्यूजी महाराज यांची दुसरी पत्नी आयुषी, कन्या कुहू आणि बहिणीसह डॉ. पवन राठी यांच्या साक्षी यात महत्त्वपूर्ण ठरल्या.

प्रकरणाच्या तपासादरम्यान भय्यूजी महाराजांची एक डायरी मिळून आली होती. त्यात ‘आयुष्याला कंटाळलो आहे म्हणून जगणे सोडतो आहे’, असे भय्यूजी महाराजांनी लिहिले होते. आरोपी विनायक याला या डायरीत त्यांनी विश्वासपात्र संबोधले होते. तपासादरम्यान सिंह यांनी काहींचे जबाबही नोंदविले होते. यापैकी कुणीही खटल्यातील दोषींवर तेव्हा संशय व्यक्त केला नव्हता, असेही सिंह यांनी सांगितले.
आत्महत्येच्या घटनेनंतर 6 महिन्यांनी पोलिसांनी विनायक, शरद आणि पलक यांना अटक केली होती. खटल्यात भय्यूजी महाराज यांची दुसरी पत्नी आयुषी यांचा जबाब सर्वांत शेवटी नोंदविण्यात आला.

Back to top button