क्रीडा संकुलाला टिपू सूलतान नाव दिल्याने ‘रामायण’ सुरु ; भाजप, बजरंग दलाचा कडाडून विरोध | पुढारी

क्रीडा संकुलाला टिपू सूलतान नाव दिल्याने 'रामायण' सुरु ; भाजप, बजरंग दलाचा कडाडून विरोध

मुंबई; पुढारी ऑनलाईन

मुंबई मालवणी येथील क्रीडा संकूलाला टिपू सुलतान नाव दिल्याने चांगलेच रणकंदन माजले आहे. भाजप आणि बजरंग दलाने टिपू सुलतान नावाला कडाडून विरोध करत रस्त्यावर उतरले आहेत.

भाजयुवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजिंदर सिंह तिवाना यांच्या नेतृत्वात मालवणी येथील आंदोलन करण्यात आले. आंदोलन पांगवण्यासाठी पोलीसांनी काही कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. दुसरीकडे मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचेही कार्यकर्ते समोर आल्याने तणाव निर्माण झाला.

आता या वादात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, ज्या टिपू सुलतानने हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले, तो देशगौरव होऊ शकत नाही. त्याचे नाव मैदानाला देणे सर्वथा गैर आहे. आम्ही हे कदापि खपवून घेणार नाही. हा निर्णय रद्द झाला पाहिजे.

दुसरीकडे पालकमंत्री अस्लम शेख यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, गेल्या ७० वर्षांपासून टिपू सुलतान नावावरून कोणताही वाद नव्हता, पण आज भाजपने देशाला बदनाम करण्यासाठी गुंड पाठवले आहेत. प्रकल्पांच्या नावावरून भाजप राडा करत देशाच्या विकासाला खीळ घालत आहे. आपल्याला नामकरणावरून वादात जाण्याची गरज नाही.

हे ही वाचलं का ?

Back to top button