सांगली : शिवाजीराव नाईक राष्ट्रवादीच्या वाटेवर?

सांगली : शिवाजीराव नाईक राष्ट्रवादीच्या वाटेवर?
Published on
Updated on

इस्लामपूर : मारुती पाटील

शिराळ्याचे भाजपचे माजी आमदार शिवाजीराव नाईक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाटेवर आहेत. त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित असून लवकरच ते जाहीर पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा मतदारसंघात आहे. नाईक यांचा हा राष्ट्रवादी प्रवेश शिराळा – वाळवा तालुक्यात भाजपला धक्का देणारा तर राष्ट्रवादी पक्ष आणखी भक्कम करणारा ठरणार आहे. दरम्यान, यासंदर्भात नाईक यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी 'या विषयावर चार दिवसांत बोलू' असे सांगितले.

सन 1995 पासून चारवेळा शिराळा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करणारे शिवाजीराव नाईक यांनी सातत्याने राजकीय भूमिका
बदलली आहे. सन 1995 ला अपक्ष, सन 1999 ला राष्ट्रवादी, सन 2004 ला पुन्हा अपक्ष तर 2014 ला भाजपतर्फे त्यांनी विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे. आपल्या राजकीय प्रवासात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या शक्तीमान नेत्यांचा विरोध मोडीत काढत शिराळा विधानसभा मतदार संघात सन 2014 च्या निवडणुकीत त्यांनी कमळ फुलवले होते. त्यांचा पंचायत राजमधील गाढा अभ्यास, कामाची निटनेटकी पध्दत, प्रशासनावरील पकड, बारीक-सारीक गोष्टींचा असलेला अभ्यास पाहून त्यांना भाजप- शिवसेना युती सरकारमध्ये मंत्रीपद मिळेल, अशी मतदार संघातील कार्यकर्त्यांना अपेक्षा होती. मात्र भाजप नेतृत्वाने त्यांची दखल घेतली नाही.

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेक आश्वासने दिली होती. ती आश्वासने पाळली गेली नसल्याने तसेच मागील विधानसभा निवडणुकीत भाजप सम्राट महाडिक यांची बंडखोरी थोपवू न शकल्याने नाईक पक्षावर नाराज होते. महाडिक यांच्या बंडखोरीमागे भाजपमधीलच काही नेत्यांचे पाठबळ असल्यानेच नाईक यांचा पराभव झाल्याचा आरोपही त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला होता.
अलिकडच्या काळात ते पक्षात काहीसे बेदखलच झाले होते.

त्यामुळे ते भाजपासून दुरावत चालल्याची चर्चा सुरू होती. निवडणुकीच्या जाहीर सभांमधून भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाईक यांना मंत्रीपद देण्याची घोषणा केली होती. मात्र या नेत्यांनी आपला शब्द पाळला नाही. तसेच नाईक यांच्या अडचणीत आलेल्या संस्थांना पक्षाकडून आर्थिक सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे नाईक यांनी भाजपला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

नाईक यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासाठी ना. पाटील यांनीच पुढाकार घेतल्याचे बोलले जाते. पक्षप्रवेशासंदर्भात ना. पाटील व शिवाजीराव नाईक यांच्यात प्राथमिक बैठका झाल्याची तसेच नाईक यांच्या पक्षप्रवेशाला शिराळ्याचे राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक यांचीही सहमती असल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीत प्रवेशाच्या बदल्यात नाईक यांच्या अडचणीतील संस्थांना जिल्हा मध्यवर्ती व इतर बँकांच्या माध्यमातून कर्जपुरवठा तसेच त्यांचे चिरंजीव रणधीर नाईक यांचे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकीय पुनर्वसन व अनेक वर्षे रखडलेल्या वाकुर्डे बुद्रूक योजनेचे काम लवकर मार्गी लावणे अशी आश्वासने दिल्याचे सांगितले जात आहे. पक्ष प्रवेशासंदर्भात नाईक हे स्वत: आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन त्यांचे मत अजमावून घेत आहेत. येत्या आठ – दहा दिवसात हा पक्षप्रवेश होणार आहे.

राष्ट्रवादीची ताकद वाढणार…

नाईक यांना राष्ट्रवादीत घेऊन प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील यांनी पुन्हा एकदा बेरजेचे राजकारण केले आहे. नाईक यांचे शिराळा तालुका आणि वाळवा तालुक्यांतील 48 गावांत गट कार्यरत आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद – पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीला त्याचा मोठा फायदा होणार आहे. या मतदारसंघात भाजपला आता सत्यजित देशमुख व सम्राट महाडिक या युवा नेत्यांना बळ देऊन पक्षाची ताकद वाढवावी लागणार आहे.

दुसरे माजी आमदार कोण?

गेल्या काही महिन्यांपासून सांगली जिल्ह्यातील भाजपचे दोन माजी आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. नाईक यांचा राष्ट्रवादी प्रवेश जवळ- जवळ निश्चित झाला आहे. आता भाजप सोडणारे जिल्ह्यातील दुसरे माजी आमदार कोण, याची उत्सुकता जिल्ह्यात आहे. त्याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news