काय आहे पश्‍चिम यूपीचा ट्रेंड? कमी मतदानाचा फायदा भाजपला की, विरोधकांना संजीवनी? | पुढारी

काय आहे पश्‍चिम यूपीचा ट्रेंड? कमी मतदानाचा फायदा भाजपला की, विरोधकांना संजीवनी?

लखनौ : उत्तर प्रदेशात कुणाचे सरकार येणार, हे 10 मार्च रोजीच स्पष्ट होणार असले तरी पहिल्या टप्प्यात 2017 च्या तुलनेत 2022 मध्ये मतदानाची टक्केवारी घसरल्याने त्याचे विविध अर्थ लावले जात आहेत. मागील तीन विधानसभा निवडणुकांची आकडेवारी पाहिली तर दिसते की, जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढली आहे तेव्हा सत्ताधार्‍यांना नुकसान झाले आहे. हे गृहीतक मानले तर कमी मतदानामुळे भाजपला मानणार्‍यांचे चेहरे खुलले आहेत; पण ग्रामीण भागात मुस्लिम आणि जाट मतदार मोठ्या संख्येने असून, तिथे बंपर मतदान झाले आहे. त्यामुळे विरोधकही आनंदात आहेत. राजकीय जाणकारांच्या मते, ग्रामीण भागात वाढलेले मतदान भाजपसाठी चिंताजनक ठरू शकते. कारण, मतदानात वाढ म्हणजे परिवर्तन असे समीकरण मानले जाते.

2007 मध्ये पहिल्या टप्प्यात 48.26 टक्के मतदान मिळवून बसपने सत्ता काबीज केली होती. 2012 मध्ये पहिल्या टप्प्यात 61 टक्के मते मिळवून सप सत्तेत आला, तर 2017 मध्ये 64.56 टक्के मते मिळवून भाजप सत्तेत आला. 2022 मध्ये ट्रेंड बदलला आहे. यावेळी मतदान तीन टक्के कमी झाले आहे. राजकीय विश्‍लेषकांच्या मते, ध्रुवीकरण आणि शेतकरी आंदोलनाचा परिणाम स्पष्टपणे दिसून येणार आहे. जाट आणि मुस्लिम एकजूट झाली की नाही, हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.

उत्तर प्रदेश वार्तापत्र जिल्हानिहाय मतदान
उत्तर प्रदेश वार्तापत्र जिल्हानिहाय मतदान

पश्‍चिम यूपीतूनच जातो सत्तेचा मार्ग

लखनौत मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मिळवायची असेल तर त्यासाठी पश्‍चिम उत्तर प्रदेशातून प्रवेश करावा लागतो. आतापर्यंतच्या निवडणुकांचा ट्रेंड पाहता ज्यांनी पश्‍चिम यूपीत विजयाचा ध्वज फडकवला, त्यांना सत्ता स्थापन करण्यापासून कुणीही रोखू शकले नाही. 2017 मध्ये भाजपने 58 पैकी 53 जागा जिंकल्या होत्या. 2017 च्या तुलनेत पहिल्या टप्प्यात 3 टक्के कमी मतदान शेतकरी आंदोलन, ध्रुवीकरणाचा परिणाम निकालात दिसणार आहे.

घराणेशाही जोपासणार्‍यांना ते पराभूत होणार आहेत, हे कळले आहे. पहिल्या टप्प्यात भाजपला मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे.
– नरेंद्र मोदी, पंतप्रधान

आता नागरिक 10 मार्चची वाट पाहत नसून पहिल्या टप्प्यात नागरिकांनी त्यांचा निर्णय केला आहे.
– अखिलेश यादव,
अध्यक्ष, समाजवादी पक्ष

यूपी निवडणुकांत पहिल्या टप्प्यातील मतदान
2007 – 48.26 टक्के – बसपचे सरकार स्थापन
2012 – 61.03 टक्के – सपचे सरकार स्थापन
2017 – 64.56 टक्के – भाजपचे सरकार स्थापन
2022- 60.17 टक्के

हेही वाचलंत का?

Back to top button