मिरजेतील महिलेची दोन मुलांसह तलावात उडी | पुढारी

मिरजेतील महिलेची दोन मुलांसह तलावात उडी

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

महिलेने आपल्या दोन मुलांसह तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. यापैकी आईसह धाकट्या मुलाचा मृतदेह मिळाला. येथील अरगन तलावात शुक्रवारी सायंकाळी 4.30 वा. ही घटना उघडकीस आली. क्रिशा मनीष केशवानी (36, रा. सह्याद्रीनगर, शेवटचा बसथांबा, मूळगाव मिरज, जि.सांगली) व भावीर (वय 4) यांचे मृतदेह सापडले आहेत. मोठा मुलगा वीरेन (वय 7) याचा रात्री उशिरापर्यंत शोध घेतला. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

सकाळी 9.30 च्या सुमारास क्रिशा यांचे पती मनीष केशवानी रामदेव गल्लीतील कापड दुकानाकडे निघून गेले. यानंतर घरी क्रिशा, मुले भावीर व वीरेन होते. सकाळी 10.15 च्या सुमारास दोन्ही मुलांना शाळेत सोडण्यासाठी त्या घरातून बाहेर पडल्या. परंतु, त्या शाळेकडे गेल्याच नाहीत. बाराच्या सुमारास मनीष यांनी फोनाफोनी केली तेव्हा मुलांना शाळेत सोडून त्या घरी गेल्या नसल्याचे स्पष्ट झाले. दोन्ही मुले महिला विद्यालयात शिकत होती. त्यामुळे त्यांना तरी शाळेत सोडलेय का? याची शाळेत जाऊन माहिती घेतली असता मुले शाळेत नव्हती.

आठ वर्षांपूर्वी विवाह

क्रिशा यांचा आठ वर्षांपूर्वी मनीष केशवानी यांच्याशी विवाह झाला. क्रिशा यांची मोठी बहीण संगीता यांना देखील बेळगावातच दिले आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर त्यांना देखील बोलावून घेतले. आमच्यात काहीही वाद नव्हता, असे पती मनीष यांनी कॅम्प पोलिसांना सांगितले. त्यामुळे त्यांनी आत्महत्या का केली? यामागील निश्चित कारण समजू शकले नाही. क्रिशाच्या पालकांना याची माहिती दिली आहे. त्यांची आई एका समारंभाला सातारा जिल्ह्यातील कराड येथे गेल्या आहेत. त्या बेळगावात आल्यानंतरच याची फिर्याद नोंद होईल व त्यानंतर याचे नेमके कारण समजू शकेल, असे कॅम्पचे पोलिस निरीक्षक प्रभाकर धर्मट्टी यांनी सांगितले.

दुचाकी हिंडलगा गणपतीजवळ

दोन्ही मुलांना शाळेत सोडण्यासाठी क्रिशा त्यांची दुचाकी घेऊन बाहेर पडल्या होत्या. परंतु, तलावाजवळ काहीच सापडले नाही. मग दुचाकी गेली कुठे? याचा शोध पोलिस घेत होते. रात्री उशिराने ही दुचाकी हिंडलगा गणपती मंदिराजवळील मेडप्लस मेडिकल शॉपसमोर आढळून आली. परंतु, या ठिकाणी दोन्ही मुलांचे दप्तर देखील नसल्याचे दिसून येत होते.

Back to top button