फायदेशीर गवार लागवड | पुढारी

फायदेशीर गवार लागवड

फळभाज्यांमध्ये गवार, भेंडी यासारख्या तर पालेभाज्यांमध्ये मेथीसारख्या भाज्यांचा वापर केला जातो. यापैकी जिरायती पिकांसोबत केवळ पावसाच्या पाण्यावर तग धरणारे आणि फोफावणारे पीक म्हणून गवारीला प्राधान्य दिले जाते. द्विदल वर्गातील या भाजीत प्रथिने (प्रोटिन्स) भरपूर प्रमाणात असल्याने तिच्या सेवनाने चांगले पोषणही होते. आयुर्वेदात मात्र गवार वातूळ असल्याचे सांगितले आहे. अर्थात गवार पाचक तर आहेच पण शेंगा खुडलेली गवारीची झाडेही वाया जात नाहीत. गुरांच्या चार्‍यासाठी या झाडांचा प्रामुख्याने वापर केला जातो.

गवारीच्या बियांपासून डिंक काढण्याचे तंत्रज्ञान विकसित झाल्याने शेतकर्‍यांना आता बरेचसे पर्याय उपलब्ध झाले आहेत. या डिंकाला परदेशातही मागणी वाढू लागली आहे. यामुळे देशाच्या परकीय गंगाजळीतही भर पडू शकेल. गवारीचे पीक तत्काळ नाशवंत नसल्याने ते दूरपर्यंत पाठवता येते. त्यासाठी खर्चही फारसा लागत नाही. गवारीच्या झाडांचा खत म्हणूनही वापर केला जातो. शेतीकडे उद्योग म्हणून आपण जेव्हा पाहतो तेव्हा प्रत्येक पिकाच्या सर्वांगिण उपयुक्ततेची चर्चाही होणे अगत्याचे ठरते. व्यापारी नजरेतून पाहिल्यास गवारीच्या लागवडीत भरपूर फायदा मिळतो; मात्र त्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने पीक लागवड होणे गरजेचे आहे.

गवारीच्या लागवडीसाठी हवामान व जमीन कशा प्रकारची असायला हवी? या पिकाला अतिशय कमी पाणीही पुरेसे होते त्यामुळे उष्ण हवामान आणि अत्यल्प पाऊस असलेल्या भागातही हे पीक चांगले येते. अतिथंड हवामानाचा मात्र पिकावर विपरीत परिणाम होतो. गवार खरीप व रब्बी हंगामातही घेता येते. गवार कसदार जमिनीत चांगली पोसली जाते. पाण्याचा उत्तम निचरा असलेली व मध्यम ते भारी जमीन या पिकासाठी आदर्श ठरते. पिकाला 20 ते 30 अंश सेल्सिअस तापमान योग्य ठरते. उष्ण व दमट हवेत गवारीच्या पिकाची वाढ जोमाने होते. हलक्या जमिनीत भरपूर सेंद्रिय खतांचा वापर करून हे पीक घेतल्यासही चांगले उत्पन्न देते. गवारीचे उत्पादन चांगले येत असल्याने जमिनीची मशागत योग्यप्रकारे होणे स्वाभाविक आहे. जमीन भुसभुशीत केल्यास पिकाच्या वाढीला पोषक ठरते. त्यामुळे झाडाची मुळे चांगली वाढून लांबपर्यंतचे अन्नघटक शोषू शकतात.

जमिनीतील अधिकाधिक अन्नघटक शोषल्याने झाडाची वाढही जोमदारपणे होते. यासाठी उभी व आडवी नांगरणी करावी. कुळवाच्या काही पाळ्या द्याव्यात. या पिकाच्या वाढीसाठी कुजवलेले शेणखत आदर्श ठरते. हेक्टरी 22 ते 23 टन शेणखताचा वापर उपयुक्त ठरतो, असे संशोधनाअंती दिसून आले आहे. गवारीची लागवड सर्व हंगामात करणे शक्य आहे. या पिकाला थंड हवामान फारसे मानवत नसल्याने हिवाळ्यात याची लागवड केली जात नाही. अतिशय कमी तापमानाचा परिणाम पिकाच्या वाढीवर होत असल्याने ही लागवड आर्थिकद़ृष्ट्या आतबट्ट्याची ठरू शकते. शिवाय भुरीसारख्या विविध रोगांच्या संक्रमणाची भीती असते.

उन्हाळी हंगामात गवार लागवड आर्थिकद़ृष्ट्या फायद्याची ठरणारी आहे. गवारीची पेरणी करण्यापूर्वी बी चांगले दोन-अडीच तास पाण्यात भिजवून ठेवावे. त्यानंतर सावलीत सुकवून मग पेरणी केल्यास उगवण अधिक होते. जमिनीला आधी पाणी देऊन वाफेवर आणून पेरणी केल्यासही त्याचे परिणाम चांगले निघतात. पेरणीनंतर थोडे पाणी द्यावे. पेरणीसाठी एका हेक्टरला सुमारे 20 किलो बियाणे पुरेसे होते. पेरणीपूर्वी बियाण्याला जिवाणू संवर्धक चोळायला विसरू नका.

जिवाणू संवर्धक अतिशय उपयुक्त

मुळांवरील नत्र ग्रंथींच्या वाढीला जिवाणू संवर्धक अतिशय उपयुक्त असते. ते जमिनीचे पोषणही करते. गवार लागवड महाराष्ट्रात प्रामुख्याने सरीवरंबा पद्धतीने केली जाते. आवश्यक तितके अंतर ठेवून पेरणी करावी. गवार हे शेंगवर्गातील पीक असल्याने व दमट-उष्ण हावामानात घेतले जात असल्याने त्याला खतांची फारशी गरज भासत नाही. मात्र बागायती शेती असल्यास हेक्टरी 22 ते 23 टन शेणखत देण्याची गरज आहे. बागायतीतील पाण्याचा सतत वापर व त्यामुळे येणारा थंडावा पिकाला घातक ठरू नये, हा ही एक उद्देश यामागे असतो. गवारीची आंतरमशागत फारशी किचकट नाही. पेरणी केल्यावर दोन आठवड्यांनी रोपांची विरळणी करावी. यामुळे पिके जोमदारपणे वाढण्यास हातभार लागतो. आणखी आठवड्याभराने खुरपणी करावी. तण, गाजरगवत आले असल्यास ते काढून टाकावे. त्यानंतर तणांचे प्रमाण किती आहे, याची पुढील खुरपणी करण्याचा निर्णय शेतकर्‍यांनी घ्यायचा आहे.

गवारीचे पाणीव्यवस्थापन

गवारीचे पाणीव्यवस्थापन काळजीपूर्वक झाल्यास पिकाच्या वाढीस चांगले असते. गवारीचे उत्पादन गुच्छाने येते. अर्थात एका घोसात गवारीच्या शेंगा येत असल्या तरी त्यांची वाढ मात्र एकसारखी नसते. गवार लागवड कमी-जास्त आकाराच्या या शेंगा काढताना नाजूक शेंग दुखावली जाणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. विक्रीसाठी हिरव्या कोवळ्या आणि वाढ पूर्ण झालेल्या शेंगांची निवड करावी व खुडणी करावी. अशा प्रकारच्या कोवळ्या शेंगांना बाजारात भाव चांगला मिळतो.

– जगदीश काळे

हेही वाचलतं का?

Back to top button