

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : चंद्रपूर येथे १६ ऑगस्ट १९४२ च्या स्वातंत्र्य क्रांतीलढ्याला ८० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मंगळवारी चिमूर येथे शहीद स्मृतिदिन सोहळा पार पडला. या कार्यक्रम प्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, केंद्र सरकारने गोरगरिबांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत, परंतु महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षाच्या कार्यकाळात सर्व योजना जनतेपर्यंत पोहोचल्या नाहीत. असा गंभीर आरोप फडणविस यांनी केला आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले, केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजनांची राज्यात अंमलबजावणी करून गोरगरिबांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणू. केंद्र सरकारच्या गोरगरिबांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून गरीबांना घरे देण्यात येत आहेत. प्रत्येक कुटुंबाला नळाद्वारे पाणी मिळावे याकरिता हर घर जल योजनेची अंमलबजावणी केली जात आहे. प्रत्येक घरात सिलेंडर देण्याची योजना राबविल्या जात आहे. या लोककल्याणकारी योजनांच्या माध्यमातून गोरगरिबांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यात येणार आहे.
शिंदे आणि भाजप सरकारच्या माध्यमातून लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करून गोरगरिबांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मी चिमूर क्रांतीभूमीत शहिदांना नमन करण्यासाठी आलो आहे. याच क्रांतीभूमीत चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्ती कुमार भांगडिया हे येथील शेतकरी शेतमजूर गरिबांची सेवा करीत आहेत. गोरगरिबांची सेवा करणे हा सर्वात मोठा आशीर्वाद आहे आणि तो आशीर्वाद आपण नेहमी घेत राहावा. याकरिता आम्ही सर्व ताकदीनिशी आपल्या पाठीशी उभे आहोत असेही ते म्हणाले.
चिमूर जिल्हा व्हावा याची नागरीकांना फार उत्सुकता लागली आहे. परंतु जिल्हा एकच होत नाही त्याकरिता अनेक जिल्हे निर्माण व्हावे लागतात. परंतु त्यापूर्वी जो जिल्हा निर्माण करावयाचा आहे त्या ठिकाणी आवश्यक असणारा इन्फ्रास्ट्रक्चर तयार असेल तर त्याचा विचार आधी केला जातो. चिमूर मध्येही इन्फ्रास्ट्रक्चर तयार आहे त्यामुळे महाराष्ट्रात नवीन जिल्ह्यांची निर्मिती होईल त्यावेळी चिमूर जिल्ह्याचा विचार केला जाईल परंतु जिल्हाला आवश्यक असणारे सर्व कार्यालय या ठिकाणी सुरू करून येथील नागरिकांना चांगल्या सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या जात असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
या क्रांतीभूमीला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची प्रेरणा मिळालेली आहे त्यांच्या प्रेरणेने 1942 च्या स्वातंत्र्यलढा उदयास आला. त्यांनी गायलेल्या भजनाच्या माध्यमातून क्रांती लढ्याची मशाल पेटली. चिमूर क्रांतीभूमीचा इतिहास आणि येथील क्रांतिवीरांनी दिलेले बलिदानाचा इतिहास भावीपिढीच्या स्मरणात राहावा याकरिता येथील इतिहासावर एक डॉक्युमेंटरी तयार व्हावी. त्या माध्यमातून तो इतिहास भावीपिढी पर्यंत पोहोचविला जावा, याकरिता सांस्कृतिक मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांना त्यांनी क्रांती लढ्याच्या इतिहासावर लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना केल्या.
दरम्यान, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गोरगरिबांच्या घरांची पडझड झाली आहे. त्यांना मदतीची नितांत आवश्यकता आहे. मी काही दिवसांपूर्वी चिमूर तालुका दौरा करून अतिवृष्टीच्या नुकसानीची पाहणी केली. त्यामुळे शेतकरी शेतमजूर गोरगरीब संकटात आहे. त्यांच्या मदतीला धावून येणे हे आमच्या सरकारचे कर्तव्य आहे. त्यांना दुपटीने मदत मिळावी याकरिता सरकार काम करीत आहे. ही मदत पावसाळी अधिवेशन झाल्याबरोबर शेतकरी शेतमजुरांच्या खात्यामध्ये तातडीने दिल्या जाईल असेही फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी चिमूर विधान क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी, सुमारे तीन वर्ष अस्तित्वात असलेल्या महाविकास आघाडी सरकारला तीनचाकी सरकारची उपमा देत, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रूपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली होती. परंतु आज देतो उद्या देतो म्हणून अद्याप दिले नाही. राज्यात आता शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार अस्तित्वात आल्यामुळे शेतकऱ्यांना मागील सरकारने केलेली घोषणा या सरकारच्या कार्यकाळात पूर्ण केल्या असा विश्वास व्यक्त करीत शेतकऱ्यांना सोन्याचे दिवस आले असे समजायला काही हरकत नाही नसल्याचे सांगितले.
राज्यात भाजप सेना युतीचे सरकार असताना आणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे असताना त्यांच्या कार्यकाळात शेतकऱ्यांची वीज कापण्याकरिता शेतावर कधी लाईनमेन गेला नाही. मात्र अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात जिथे तिथे शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन लाईन कापणारे लाईनमनच भेटत होते असा टोलाही लगावला. चिमूर जिल्ह्याची मागणी करणाऱ्या काही काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आमदार भांगडिया यांनी बेडकाची उपमा देत काँग्रेसच्या कार्यकाळात त्यांनी कधी जिल्ह्याची मागणी केली नाही मात्र राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार येतात चिमूर जिल्हा हवा याकरता डोके वर आहे. काँग्रेसच्या कार्यकाळात चिमूर जिल्हा का करता आला नाही? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
सात वर्ष काँग्रेसने ज्या गोष्टी केल्या नाही त्या सात दिवसांत फडणवीस सरकारने रेल्वेचा प्रस्ताव मंजूर करून दाखवून दिले आहे. शेतकऱ्यांना दोन हेक्टर पर्यंत मदत देण्याची अट आता तीन हेक्टर पर्यंत झाली आहे. अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर होवूनही सूरू होवू दिले नाही तोही प्रश्न निकाली निघाला आहे. लवकरच याठिकाणी अतिरिक्त जिल्हाधिकारी रूजू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी वन मंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची समायोचीत भाषणे झालीत. यावेळी मंचावर राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, वने, सांस्कृतिक व मत्स्य कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, खासदार अशोक नेते, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कीर्तीकुमार भांगडिया,आमदार किशोर जोरगेवार, आमदार कृष्णा गजबे, आमदार नामदेव होळी, माजी आमदार नितेश भांगडिया, माजी आमदार संजय धोटे, माजी आमदार सुधीर पारवे, माजी आमदार संजय धोटे, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे तसेच भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा